निर्घृण हल्ल्यात प्राण गमावलेला सरबजितसिंग शुक्रवारी पंचत्वात विलीन झाला असला तरी त्याच्या मृत्यूचे कवित्व सुरूच आहे. आता त्याच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव ‘गायब’ असल्याचा अहवाल वैद्यकीय तज्ज्ञांनी सादर केला आहे. सरबजितचा व्हिसेरा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार नसल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
सरबजितचे पार्थिव गुरुवारी सायंकाळी विशेष विमानाने येथे आणण्यात आले. त्यानंतर येथील सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यावर ऑटोप्सी प्रक्रिया केली. हा अहवाल शुक्रवारी जाहीर झाला. अहवाल तयार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने मात्र धक्कादायक माहिती उघड केली. सरबजितच्या शरीरातील अनेक महत्त्वाचे अवयव गायब असल्याचे या तज्ज्ञांनी स्पष्ट केले. त्यात सरबजितचा मेंदू, हृदय, यकृत आणि किडनी यांचा समावेश आहे. तसेच सरबजितवर दोनपेक्षा अधिक जणांनी हल्ला केला असावा असाही निष्कर्ष या तज्ज्ञांनी काढला आहे. सरबजितच्या डोक्याला तसेच मेंदूला जबर इजा पोहोचली होती तसेच त्याच्या पाठीच्या कण्यावरही जबर प्रहार झाला होता असे ऑटोप्सी अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच सरबजितवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला नसावा असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे सरबजितच्या मृत्यूचे गूढ कायम राहिले आहे. लाहोरमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी सरबजितच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीचा तसेच व्हिसेराचा अहवाल दिला तरच त्याच्या मृत्यूचे खरे कारण समजू शकणार असल्याचे या वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाने म्हटले आहे.

Story img Loader