सोशल मीडियावर अभिनेत्री स्वरा भास्करवर आक्षेपार्ह टिप्पणी करणं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला चांगलंच महागात पडलं. स्वरा भास्करने याबद्दल ट्विटरकडे तक्रार नोंदवली. अखेर ट्विटरने मध्यस्ती करत विवेक अग्निहोत्रीचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक केले.

स्वरा भास्करने केरळचे आमदार पी. सी. जॉर्ज यांच्या एका वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला होता. जॉर्ज यांनी न्यायाची मागणी करणाऱ्या एका बलात्कार पीडित ननविरोधात अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. पीडितेने केलेल्या बलात्काराच्या आरोपांवर शंका उपस्थित करताना जॉर्ज यांनी त्या पीडितेलाच वेश्या असं म्हटलं. ‘अत्यंत लज्जास्पद. भारताच्या राजकीय आणि धार्मिक विभाजनावर उपस्थित असलेला हा मळका तवंग. खरंच घृणास्पद वक्तव्य आहे,’ अशा शब्दांत स्वराने फटकारलं.

स्वराच्या या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विवेक अग्निहोत्रीची जीभ घसरली. लैंगिक अत्याचाराविरोधातील #मीटू मोहिमेशी संदर्भ जोडत अग्निहोत्रीने ‘फलक कुठे आहे? #MeTooProstituteNun?,’ असं ट्विट केलं. या आक्षेपार्ह ट्विटवर स्वरा भडकली. यानंतर स्वरा आणि विवेक यांच्यात वाक्युद्ध रंगलं. अखेर स्वराने ट्विटरकडे याविरोधात तक्रार नोंदवली.

स्वराच्या तक्रारीची दखल घेत ट्विटरने विवेक अग्निहोत्रीचे अकाऊंट ब्लॉक केले. ‘तुम्ही तक्रार केलेला ट्विटर अकाऊंट तपासल्यानंतर त्यांचं ट्विट ट्विटरच्या नियमांबाहेरचं असल्याचं आम्हाला आढळलं. आम्ही ते अकाऊंट ब्लॉक केलं,’ असं उत्तर ट्विटरने दिलं. त्याचे स्क्रिनशॉट शेअर करत स्वराने ट्विटरचे आभार मानले.

Story img Loader