‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी जहांगीरपुरीत झालेल्या हिंसेवर प्रतिक्रिया दिलीय. विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत ज्यांना ‘काश्मीर फाईल्स’ भूतकाळ वाटतो ते चुक आहेत, असं मत व्यक्त केलं. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी घडलेल्या हिंसेचा व्हिडीओ पोस्ट करत हा पुरावा पाहा, असं म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विवेक अग्निहोत्री म्हणाले, “ज्यांना वाटतं काश्मीर फाईल्स काश्मीरचा भूतकाळ होता, तर ते चुक आहेत. तो फक्त भारताच्या भविष्याचा ट्रेलर आहे. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीचा हा पुरावा पाहा.”

विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्वीटवर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका युजरने म्हटलं, “आपल्यावर होणाऱ्या हल्ल्यांना आपला भित्रेपणा, जादीवाद, स्वार्थीपण आणि नफेखोरी जबाबदार आहे. आपण फक्त स्वतःचा विचार करतो. जिहादी त्यांच्या धर्मासाठी आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचा विचार करतात. आम्हाला पुजा केली तरी लाज वाटते. मात्र, दर्ग्यावर चादर चढवणं फॅशन आहे. त्याचा परिणाम हे हल्ले आहेत.”

अन्य एका युजरने भारताला हिंदुराष्ट्र घोषित करण्याची मागणी केली. असं केल्यास आपोआप कट्टरतावाद संपेल, असा दावाही केला.

दुसरीकडे एका युजरने विवेक अग्निहोत्री यांच्या ट्वीटवर फॅक्ट चेकिंग वेबसाईट अल्ट न्यूजचे सहसंस्थापकांनी पोस्ट केलेला एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तो व्हिडीओ जहांगिरपुरामधील दंगलीचा असल्याचं म्हटलंय. त्यात हिंदुत्ववादी जमावाच्या हातात लाठ्याकाठ्या दिसत आहेत. यावर अग्निहोत्री यांचं म्हणणं काय असा सवाल करण्यात आला.

एका युजरने म्हटलं की जर कुणाला वाटत असेल की विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट प्रपोगंडा नाही, तर त्यांनी खालील व्हिडीओ पाहावा.

अन्य एका युजरने म्हटलं की आपण दुसरी बाजू का पाहत नाही.

एका युजरने प्रसिद्ध पत्रकार राणा आयुब यांनी पोस्ट केलेला एक व्हिडीओ विवेक अग्निहोत्री यांच्या ट्वीटखाली पोस्ट केला. त्यात मुस्लीम महिलांच्या बलात्काराचं आवाहन केलं जात असल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : “जेव्हा मुस्लीम बहुसंख्याक असतो तेव्हा हिंदू…”, शरद पवारांचं The Kashmir Files वरील वक्तव्य चर्चेत

एकूणच विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्वीटवर समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek agnihotri tweet on delhi violence on hanuman jayanti celebration pbs