अमेरिकेत यावर्षी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी विविध नेत्यांनी उमेदवारीसाठी इच्छा जाहीर केली आहे. अमेरिकेतील भारतीय वंशांचे विवेक रामास्वामी हे सुद्धा रिपब्लिन पक्षातून उमेदवारीबाबत इच्छूक होते. परंतु, त्यांनी आता उमेदवारी मागे घेतली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोवा कॉकस निवडणुकीत बाजी मारल्याने विवेक रामास्वामी यांनी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
रिपब्लिकन पक्षातून विवेक रामास्वामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी इच्छूक होते. तर, डोनाल्ड ट्र्म्प यांच्यासह रिपल्बिकन पक्षाकडून सहाजणही या शर्यतीत होते. आयोवा कॉकसमध्ये (पक्षाकडून उमेदवारीबाबत झालेली बैठक किंवा मतदान) डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे बायोटेक क्षेत्रातील विवेक रामास्वामी यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
हेही वाचा >> ‘ब्रिक्स’ अध्यक्षपदासाठी रशियाला पाठिंबा; मोदीपुतिन यांची विविध जागतिक प्रश्नांवर दूरध्वनीवरून चर्चा
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गुन्हे दाखल असतानाही त्यांना पाठिंबा देईन, असं वचनही विवेक रामास्वामी यांनी दिले. मी डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी माझा पूर्ण पाठिंबा असेल, असंही ते म्हणाले.
CNN च्या अंदाजानुसार , ट्रम्प आयोवा कॉकस जिंकत आहेत. फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसॅंटिस दुसऱ्या स्थानावर आहेत, तर दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर निक्की हेली तिसऱ्या स्थानावर आहेत. ट्रम्प यांना ५५ हजारांपेक्षा जास्त मते आहेत, रॉन डीसॅंटिस यांच्याकडे २३ हजारपेक्षा जास्त मते आहेत, तर निक्की हेली यांना २० हजारापेक्षा जास्त मते आहेत आणि रामास्वामी फक्त आठ हजारपेक्षा जास्त मतांसह चौथ्या स्थानावर आहेत.
हेही वाचा >> मालदीव वादावर परराष्ट्रमंत्र्यांनी मौन सोडलं; म्हणाले, “मी खात्री देऊ शकत नाही की…”
रामास्वामी का चर्चेत आले होते
जर मी सत्तेत आलो तर अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येईल. अवैधरित्या राहत असलेल्या प्रवाशांवर कारवाई केली जाईल. तसंच, त्यांच्या मुलांना मिळालेलं अमेरिकेचं नागरिकत्वही रद्द केलं जाई, अशी घोषणा रामास्वामी यांनी केली होती. त्यामुळे ते बरेच चर्चेत आले होते.