पीटीआय, भुवनेश्वर
राजकारणात प्रवेश केल्यानंतर सहा महिन्यांनंतर माजी नोकरशहा व्ही. के. पांडियन यांनी रविवारी सक्रिय राजकारणातून माघार घेण्याची घोषणा केली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाच्या (बिजद) दारुण पराभवानंतर पांडियान यांनी हा निर्णय घेतला.
रविवारी एक चित्रफीत संदेश प्रसारित करून पांडियन यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली. ओडिशा माझ्या हृदयात आणि नवीन पटनाईक त्यांच्या श्वासात आहेत, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राजकारणात येण्याचा त्यांचा एकमात्र हेतू पटनाईक यांना मदत करणे हा होता. त्यामुळेच त्यांना निवडणुकीत उमेदवारी दिली नाही, असे पांडियन म्हणाले. निवडणुकीतील पराभवासाठी त्यांनी जनतेची आणि बीजेडीच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची माफीही मागितली.
हेही वाचा >>>नव्या रालोआपर्वाची सुरुवात; राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात भव्य शपथविधी सोहळा
प्रचारादरम्यान पांडियन यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर नवीन पटनाईक सलग सहाव्यांदा ओडिशाचे मुख्यमंत्री न झाल्यास आपण राजकारण सोडू, असे ठासून सांगितले होते.
नवीन पटनाईक यांच्याकडून कौतुक
पांडियन यांच्यावर सुरू असलेली टीका दुर्दैवी असल्याचे बिजदचे अध्यक्ष पटनाईक यांनी शनिवारी सांगितले. पांडियन यांनी उत्कृष्ट काम केले आहे, अशा शब्दांत पटनाईक यांनी कौतुक केले. पंडियन हे आपले उत्तराधिकारी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘‘पांडियन यांनी कोणतेही पद भूषवलेले नाही. त्यांनी कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवली नाही. तरीही त्यांच्यावर टीका झाली, हे दुर्दैवी आहे. पांडियन हे माझे उत्तराधिकारी नसून ओडिशातील जनताचा माझे उत्तराधिकारी ठरवील,’’ असे नवीन पटनाईक म्हणाले.