भारताचे लष्करप्रमुख दलबिर सिंग यांनी माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. व्ही.के. सिंग यांनी अनाकलनीय आणि विचित्र कारणे देत सुडबुद्धीने माझी बढती रोखण्याचा प्रयत्न केला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट दलबिर सिंग यांनी केला. एखाद्या भारतीय लष्करप्रमुखाने आपल्या पूर्वसूरींवर अशाप्रकारे टीका करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दलबिर सिंग यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात याबद्दलचा उल्लेख आहे. २०१२ साली तत्कालीन लष्करप्रमुख व्ही.के. सिंग यांच्याकडून माझा छळ करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी लष्करप्रमुखपदी होणारी माझी बढती रोखणे, हेच व्ही.के. सिंग यांचे एकमेव उद्दिष्ट असल्याचे दलबिर सिंग यांनी म्हटले आहे. १९ मे २०१२ रोजी मला पाठविण्यात आलेल्या नोटीसमध्ये माझ्यावर खोटे, निराधार आणि कपोकल्पित आरोप करण्यात आले होते. त्यावेळी माझ्यावर अवैधरित्या शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचेही दलबिर सिंग यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
दलबिर सिंग यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती करताना पक्षपातीपणा झाल्याच्या विरोधात निवृत्त जनरल रवी दास्ताने यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आसाममधील जोरहाट येथे डिसेंबर महिन्यात झालेल्या लष्करी कारवाईची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल व्ही.के. सिंग यांनी एप्रिल २०१२ ते मे २०१२ या काळात दलबिर सिंग यांच्यावर निर्बंध आणले होते. हा प्रकार घडला तेव्हा दलबिर सिंग जनरल ऑफिसर पदावर होते आणि त्यांच्याकडे दिमापूर येथील लष्करी तळावरच्या ३ कॉर्प्सची जबाबदारी होती. मात्र, जोरहाट येथे लष्करी कारवाई झाली त्यावेळी मी वार्षिक सुट्टीवर होतो आणि मी २६ डिसेंबरला परतलो, असे दलबिर सिंग यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.