पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, जगातल्या अनेक देशांनी या युद्धाबाबत आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. मध्य पूर्वेतील काही राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला आहे. तर अमेरिका, फ्रान्स, इटली, यूके आणि भारत या देशांनी इस्रायलच्या बाजूने भूमिका घेतली आहे. दरम्यान, एका शक्तीशाली राष्ट्राने पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. हमास-इस्रायल युद्धात रशियाने पॅलेस्टाईनचं समर्थन केलं आहे. त्याचबरोबर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या युद्धाला अमेरिका जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
व्लादिमीर पुतिन म्हणाले, मध्य पूर्वेत आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामागे अमेरिकाच आहे. इस्रायल-हमास युद्धावर पुतिन म्हणाले, तिथली परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वात आधी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्णयांतर्गत पॅलेस्टाईनला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र घोषित करण्याची गरज आहे.
पुतिन म्हणाले, दुर्दैवाने मध्य पूर्वेची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. मला असं वाटतं की, मध्य पूर्वेतील बहुसंख्य लोक माझ्या मताशी सहमत असतील की तिथल्या बिकट परिस्थितीला अमेरिका जबाबदार आहे. तिथली सध्याची परिस्थिती हे अमेरिकेच्या धोरणांमधलं अपयश दर्शवते. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधला संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका प्रयत्नांच्या नावाखाली जे काही करतेय त्यावरून स्पष्ट दिसतंय की अमेरिका तिथली परिस्थिती नियंत्रित करू पाहतेय. दुर्दैवाने तिथली परिस्थिती हाताळताना अमेरिकेने दोन्ही बाजूंचे मुख्य प्रश्न ध्यानात घेतलेले दिसत नाहीत.
रशियाचे अध्यक्ष म्हणाले, “यावेळी अमेरिकेने पॅलेस्टाईनमधील नागरिकांच्या मूलभूत हितांकडे दुर्लक्ष करण्याची चूक केली आहे. त्याचबरोबर त्यांनी दोन्ही पक्षकारांवर दबाव टाकला. ते कधी या बाजूचे असतात, तर कधी त्या बाजूचे”. पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह म्हणाले, “रशियाचे अध्यक्ष दोन्ही देशांच्या संपर्कात असून ते हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.”
हे ही वाचा >> Israel Hamas War : पॅलेस्टाईन नव्हे, ‘या’ देशात रचला इस्रायलवरील हल्ल्याचा कट, हमासला दोन देशांकडून मदत
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधल्या युद्धात गेल्या चार दिवसांत २,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी (७ ऑक्टोबर) सकाळी इस्रायलवर शेकडो क्षेपणास्रं डागली आणि युद्धाला तोंड फुटलं. क्षेपणास्र डागल्यानंतर इस्रायलच्या सीमेवर, गाझा पट्टीत अनागोंदी माजली. याच अनागोंदीचा फायदा घेत हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले. त्यानंतर या दहशतवाद्यांनी इस्रायली नागरिकांची कत्तल केली. शेकडो लोकांची गोळ्या घालून हत्या केली, तर १५० हून अधिक इस्रायली स्त्रियांचं अपहरण केलं. त्यानंतर इस्रायलनेही हमासच्या पॅलेस्टाईनमधील अड्ड्यांवर क्षेपणास्रं डागण्यास सुरूवात केली. इस्रायली सैन्याने गाझा पट्टीत अल-अक्सा स्टॉर्म ही मोहीम हात घेतली आहे.