Vladimir Putin Limousine car explodes : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या यांच्या ताफ्यातील एका लक्झरी लिमोझीन (limousine) कारमध्ये मॉस्को येथे भीषण स्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. द सनने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. या घटनेमुळे पुतिन यांच्या सुरक्षेबाबात चिंता व्यक्त केल्या जात आहेत. तसेच पुतिन यांच्या जि‍विताला रशियाच्या राजधानीतही धोका असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान ही कार जळून खाक होत असतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्या आजारपणाच्या चर्चांदरम्यान रशियाला युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्णायक धक्का बसू शकतो असे विधान केले होते त्यानंतर काही दिवसांतच हा स्फोट झाला आहे.

रशियाबरोबर सुरू असलेल्या युद्धादरम्यान झेलेन्स्की यांनी काही दिवसांपूर्वी एक खळबळजनक दावा केला होता. “व्लादिमीर पुतिन यांचा लवकरच मृत्यू होईल,” असं विधान झेलेन्स्की यांनी केले होते. त्यानंतर झालेल्या या स्फोटाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान लुब्यांका येथेल एफएसबी मुख्यालयाजवळ ही ऑरस सेनट (Aurus Senat) कार जिची किंमत २ लाख ७५ हजार पौंड सांगितली जाते, ती जळताना आढळून आली. सुरूवातीला या गाडीच्या इंजिनमध्ये आग लागली आणि ती नंतर संपूर्ण कारमध्ये पसरली असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले. अग्निशमन दलाचे जवान येण्यापूर्वीच घटनेच्या वेळी जवळच्या रेस्टॉरंट्समधील लोक मदतीसाठी धावले, असे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

दरम्यान घटनेच्या व्हिडीओमध्ये कारमधून काळा धूर बाहेर पडताना दिसत आहे. तसेच कारला झालेले नुकसान देखील दिसून येत आहे. द सनने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही तसेच य़ा घटनेत कोणालाही इजा झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

या वाहनाची देखभाल ही प्रेसिडेंट प्रॉपर्टी डिपार्टमेंट पाहते, या विभागाकडेच अध्यक्षांच्या वाहतुकीची जबाबदारी असते. आगीची घटना घडली तेव्हा कारमध्ये कोण प्रवास करत होते याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

पुतिन यांच्या हत्येचा कट?

७२ वर्षीय पुतिन हे रशियन बनावटीच्या या लिमो गाड्या नियमितपणे वापरत आले आहेत, इतकेच नाही तर त्यांनी त्या उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यासह इतर मित्र राष्ट्रांनाही भेट म्हणून दिल्या आहेत. पुतिन यांच्या जिवाला धोका असल्याच्या चर्चा सुरू असताना हा स्फोट झाला आहे.

काही दिवसांपूर्वी मुरमन्स्क येथे फेडरल प्रोटेक्शन सर्व्हिस (FSO) अधिकार्‍यांनी सेरेमोनियल गर्ड्सची देखील तपासणी केली होती. “त्यांना त्यांच्या जीवाची किती भीती आहे, हे यावरून दिसून येते,” असे एका माजी सुरक्षा रक्षकाने रशियन वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले होते, असे वृत्त द सनने दिले आहे. पुतिन त्यांच्या स्वत:च्या कर्मचार्‍यांवर देखील विश्वास ठेवत नाहीत असेही त्याने पुढे बोलताना सांगितले.

एफएसओ एजंट्स कचऱ्याच्या डबे, भाषणाच्या ठिकाणांजवळील गटारांच्या झाकणे यांची तपासणी करणे यासारख्या कडक सुरक्षा उपाययोजना राबवल्या जात असल्याने पुतिन यांची भीती स्पष्टपणे दिसून येते. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पुतिन बुलेटप्रूफ जॅकेट घालत असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. “त्यांचे (पुतिन) दिसणाऱ्या आणि अदृश्य रक्षकांच्या मोठ्या फौजेकडून संरक्षण केले जात आहे,” असे क्रेमलिनमधील एका सूत्राने द सनला सांगितले.