रशियाची राजधानी मॉस्कोमधील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये शुक्रवारी (२२ मार्च) दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात १३९ जणांचा मृत्यू झाला असून १४५ पेक्षा जास्त जण जखमी झाले. इस्लामिक स्टेट ग्रुपने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्याबाबत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पुतिन म्हणाले, “कॉन्सर्ट हॉलवर करणारे हल्लेखोर इस्लामिक कट्टरतावादी होते.” शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत पुतिन म्हणाले, इस्लामिक दहशतवाद्यांनी या हत्या केल्या आहेत. दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आणि त्यानंतर ते युक्रेनमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. ते युक्रेनला का जात होते आणि तिथे त्यांची कोण वाट पाहत होतं ते शोधणं महत्त्वाचं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्लामिक स्टेट – खोरासन या गटाने मॉस्कोतील हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. तसेच रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेकडे याचे पुष्टीकरण करणारी गुप्त माहितीसुद्धा आहे. या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी या प्रकरणी ११ दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये चार संशयित हल्लेखोरांचाही समावेश आहे.

इस्लामिक स्टेट खोरासान (ISIS-K) या दहशतवादी संघटनेने हा हल्ला करून रशियाशी असलेले शत्रुत्व अधोरेखित केलं आहे. रशियाला लक्ष्य करण्याचं कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या लष्करी हस्तक्षेपाशी संबंधित असू शकते. तसेच अनेक इस्लामिक कट्टरतावादी संघटना रशियाकडे मुस्लिमांवर अन्याय, अत्याचार करणारा देश म्हणून पाहतात. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी सीरियामध्ये हस्तक्षेप केला होता. सीरियाचे अध्यक्ष बाशर असाद यांच्या मदतीसाठी व्लादिमीर पुतिन यांनी काही रशियन सैन्य पाठवले होते. त्याचा बदला म्हणून इस्लामिक स्टेट ग्रुपने रशियाच्या कॉन्सर्ट हॉलवर हल्ला केला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याबरोबरच व्लादिमीर पुतिन यांनी सीरियासाठी जे धोरण राबवलं, त्याला विरोध म्हणून रशियावर दहशतवादी हल्ला केला असण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा >> Moscow Terror Attack: दहशतवादी हल्ल्यातील चार संशयितांना अटक; हल्लेखोरांचा हेतू काय होता?

काय आहे इस्‍लामिक स्‍टेट खुरासान?

इस्लामिक स्टेट खुरासान (ISIS-K) ही एक दहशतवादी संघटना आहे. इस्लामिक स्टेट खुरासान या संघटनेने यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. यामध्ये मशिदींवरील विनाशकारी बॉम्बस्फोट, काबूलमधील रशियन दूतावासावरील प्राणघातक हल्ला, तसेच २०२१ मध्ये काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हल्ल्याचा समावेश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vladimir putin says islamic extremists terror attack in moscow concert hall asc