मॉस्को : युक्रेनला मदत करण्यासाठी पाश्चात्य सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा धोका निर्माण होईल, असा इशारा पुतिन यांनी दिला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांचा हा इशारा आला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या आठवडय़ाच्या सुरूवातीला म्हटले होते की युक्रेनमध्ये पाश्चात्य देशांचे सैन्य तैनात होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. या विधानाचा संदर्भ देऊन, पुतिन यांनी असा इशारा दिला.
हेही वाचा >>> निवडणुकांमध्ये विजयी जागांची पडताळणी करा; कर्जवाटपाआधी इम्रान यांचे नाणेनिधीला पत्राद्वारे आवाहन
रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. युक्रेनच्या काही भागांवर रशियाने कब्जा केला आहे. पण तणाव अद्याप कायम आहे. युद्ध अद्याप थांबलेले नाही आणि युक्रेनच्या बाजूने आक्रमकताही कमी झालेली नाही. आमच्या विषयांमध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नाही. जो कोणी रशियावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल, त्याला दुसऱ्या विश्वयुद्धाहून भयंकर परिणाम भोगण्यासाठी तयार रहावे लागेल, असा इशारा पुतिन यांनी दिला आहे. रशियामध्ये १५ ते १७ मार्च या कालावधीत होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांना आव्हान देऊ शकणाऱ्या प्रमुख समीक्षकांना एकतर तुरुंगात टाकण्यात आले आहे किंवा ते परदेशात राहत आहेत, तर बहुतेक स्वतंत्र माध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे. पुतिन यांची पुन्हा निवड होणे हे खात्रीशीर मानले जात आहे.