मॉस्को : अमेरिकेबरोबर अण्वस्त्र करार स्थगित करत असल्याची घोषणा करून रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मंगळवारी अधिक आक्रमक भूमिका घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अचानक युक्रेनला भेट देऊन युद्धात अखेपर्यंत साथ देण्याचे आश्वासन वोलोदिमीर झेलेन्स्की यांना दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुतिन यांनी हे पाऊल उचलले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिका आणि रशियाने २०१० मध्ये ‘न्यू स्टार्ट’ हा एकमेव अण्वस्त्र प्रसारबंदी करार केला होता. त्याअंतर्गत दोन्ही देशांनी लांब पल्ल्यावर मारा करणाऱ्या अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीला मर्यादा घातली होती. मात्र अमेरिका आणि ‘नाटो’ रशियाविरोधात उघडपणे भूमिका घेत असल्यामुळे हा करार स्थगित करत असल्याची घोषणा पुतिन यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केली. मात्र आपण करारातून पूर्णपणे बाहेर पडत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेने अणुचाचण्या केल्या तर रशियालाही आपला अणू कार्यक्रम पुढे सुरू ठेवता आला पाहिजे, असा दावा त्यांनी केला. रशियाच्या अणू प्रकल्पांची तपासणी करण्यासाठी अमेरिका आग्रह करत आहे आणि त्याच वेळी ‘नाटो’ मात्र युक्रेनला रशियाच्या अण्वस्त्रसज्ज तळांवर हल्ले करण्यासाठी ड्रोन पुरवत आहे, असा आरोप पुतिन यांनी केला.

पाश्चिमात्य राष्ट्रेच युक्रेनमधील युद्ध भडकावत असल्याचा आणि ते संपू देत नसल्याचा आरोप पुतिन यांनी केला. युक्रेनमध्ये केलेल्या आक्रमणासाठी रशिया दोषी नाही, तर आपल्याविरोधात माहिती युद्ध छेडण्यात आल्याचे ते म्हणाले. पुतिन यांनी अणू करार स्थगित केला असला तरी अमेरिकेला आपल्या अणू कार्यक्रमात काही बदल करण्याची गरज वाटत नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. 

‘न्यू स्टार्ट’ करार काय आहे?

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी २०१० मध्ये हा करार केला. त्यानुसार दोन्ही देशांना जास्तीत जास्त १,५५० अण्वस्त्रे आणि ७०० अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे बाळगता येतील असे निश्चित करण्यात आले. कराराचे पालन होत आहे का हे तपासण्यासाठी प्रत्यक्ष जागांची पाहणी करण्याची तरतूद त्यामध्ये आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये कराराची मुदत संपण्यास काही दिवस असताना पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र, करोनाच्या उद्रेकानंतर तपासणी स्थगित केली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तपासणी पुन्हा सुरू करण्यास रशियाने नकार दिला. तेव्हापासून कराराच्या भवितव्याविषयी शंका उपस्थित होत होत्या.

आमचे युद्ध युक्रेनच्या जनतेशी नाही. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश पाश्चिमात्य देशांच्या दुटप्पीपणाचे बळी आहेत. अस्तित्वाची लढाई युक्रेन नव्हे तर रशिया लढत आहे.

– व्लादिमिर पुतिन, अध्यक्ष, रशिया

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vladimir putin to suspend participation in nuclear arms treaty with us zws