Putin issues nuclear warning: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी पाश्चिमात्य देशांना आण्विक अस्त्र वापरण्याची धमकी दिली. रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, बुधवारी राजधानी मॉस्कोमध्ये पुतिन यांनी सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली होती. यात त्यांनी अण्वस्त्रांच्या वापरासंबंधातील अटी आणि शर्ती बदलणार असल्याचेही या बैठकीत सांगितले. युक्रेनला पाश्चिमात्य देशांकडून क्रूझ क्षेपणास्त्रांचा पुरवठा झाला आहे. याचा वापर करून रशियावर दुरच्या अंतरावरूनही क्षेपणास्त्र डागता येणार आहे. याचा आढावा घेतल्यानंतर पुतिन यांनी तातडीची बैठक घेतली. अण्वस्त्रधारी देशांच्या मदतीने अण्वस्त्रधारी नसलेला देशाने पारंपरिक क्षेपणास्त्रांचा वापर केला. तर तो अण्वस्त्रधारी देशांनी आणि युक्रेननं संयुक्तरीत्या केलेला हल्ला समजण्यात येईल आणि त्याचे उत्तर अण्वस्त्रांनी देण्यात येईल, अशी धमकीच पुतिन यांनी दिली.
रशियाने आण्विक धोरणात बदल करण्याची घोषणा केल्यामुळे आता अमेरिका आणि युरोपियन देशांसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. युक्रेनला रशियावर क्षेपणास्त्र डागण्याची परवानगी द्यायची की नाही? असा प्रश्न आता या देशांसमोर उभा राहिला आहे. जागतिक पटलावरील परिस्थिती झपाट्याने बदलत असून रशियासमोर निर्माण झालेले नवीन धोके पाहता आण्विक धोरणात बदल आवश्यक आहेत, असे पुतिन यांनी सुरक्षा सल्लागार बैठकीत सांगितले.
रशियाने २०२० मध्ये आण्विक सिद्धांत लागू केला होता. रशियाचे अस्तित्व जर धोक्यात येत असेल तर अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो, असे या सिद्धांतात नमूद केले होते. ७१ वर्षीय पुतिन आता या सिद्धांतात बदल करू इच्छित आहेत. “अण्वस्त्र नसलेल्या कोणत्याही देशाने अण्वस्त्र असलेल्या देशाच्या मदतीने किंवा पाठिंब्याने रशियन महासंघावर हल्ला केला तर तो रशियावरील संयुक्त हल्ला मानला जावा”, असा नवा मुद्दा पुतिन यांनी जोडला आहे.
रशियाच्या भूमीवर क्षेपणास्त्र, हवाई किंवा ड्रोनच्या मदतीने हल्ला झाल्यास रशियाही अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या हालचाली सुरू करेल.
अमेरिकेच्या दबावानंतरही इस्रायल लेबनानवर हल्ला करण्यावर ठाम
युक्रेन-रशिया युद्धामुळे युरोपमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच तिकडे मध्य आशियातही संघर्ष पेटला आहे. इस्रायलने लेबनानवर जमिनीवरील हल्ला चढविण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी मनाई केल्यानंतरही पंतप्रधान नेत्यानहू सकारात्मक प्रतिसाद देण्यास तयार नाहीत. इस्रायलने २१ दिवसांचा युद्ध विराम घोषित करावा, अशी सूचना अमेरिकेने केली होती. “अमेरिकेच्या प्रस्तावावर पंतप्रधान नेत्यानाहू यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही”, असे निवेदन नेत्यानाहू यांच्या कार्यालयाने दिले आहे. तसेच इस्रायलच्या सैन्याला पूर्ण ताकदीनिशी हेझबोलावर तुटून पडण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.