Russia Vs Ukraine War : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट करत धक्कादायक दावा केला आहे. झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की रशियन लष्कराकडून युद्धात मरण पावलेल्या उत्तर कोरियन सैनिकाची ओळख लावण्यासाठी त्यांचे चेहरे जाळले झात आहेत.
झेलेन्स्की यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अनेक वर्षांच्या युद्धानंतर रशिया यापेक्षा खालच्या थराला जाऊ शकत नाही असे वाटत असतानाच आम्हाला त्यापेक्षा वाईट गोष्टी पाहायला मिळतात. रशिया कोरियन सैनिकांना फक्त युद्ध आघाडीवरच पाठवत नाही तर या सैनिकांच्या जीवितहानीची माहितीही लपवत आहे.
झेलेन्स्की पुढे म्हणाले की, “रशियाने कोरियन सैनिकांची उपस्थिति लपवण्याचा प्रयत्न केला. प्रशिक्षणादरम्यान त्यांचे चेहरे दाखवण्यास मनाई करण्यात आली होती. रशियाने त्यांच्या उपस्थितिचे व्हिडिओ पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि आता रशियन सैनिक युद्धात मारल्या गेलेल्या उत्तर कोरियाच्या सैनिकांचे अक्षरशः चेहरे जाळत आहेत. हा त्यांच्याप्रती अनादर आहे जो सध्या रशियामध्ये केला जात आहे”.
झेलेन्स्की यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहीले की, उत्तर कोरियाच्या सैनिकांनी पुतीनसाठी लढावे आणि जीव द्यावा यासाठी एकही कारण नाही. हा वेडेपणा थांबवला पाहिजे. झेलेन्स्की यांच्याकडून पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये उत्तर कोरियन सैनिकांचे मृतदेह जाळले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
यापूर्वी युक्रेनने युध्दात रशियासाठी लढत असलेल्या ३० उत्तर कोरियन सैनिकांना ठार केल्याचा दावा केला होता. मात्र रशियाने या दाव्यावर कुठलीही माहिती दिली नव्हती. उत्तर कोरियाचे सैनिक रशियाच्या बाजूने युक्रेनविरोधात लढत असल्याचा दावा फेटाळला आहे.
रशिया युक्रेन युद्ध
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये २४ फेब्रुवारी २०२२ पासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो सैनिकांचा जीव गेला आहे. बलाढ्य रशियाला युक्रेन झुंज देत आहे. काही दिवसांपुर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व मिळत नाही, तोपर्यंत युक्रेनमध्ये पाश्चिमांत देशांचे सैन्य तैनात करावे अशी मागणी केली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेन विरुद्ध युद्धाची घोषणा केली होती. त्यानंतर रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला चढवला होता. रशियाच्या विरोधात असलेल्या ‘नाटो’ संघटनेत सहभागी होण्यासाठी युक्रेन प्रयत्न करत आहे. जर युक्रेन नाटोचा सदस्य झाला तर नाटो देशांचे सैन्य युक्रेनच्या बाजून लढेल तसेच रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असे म्हणत रशियाने युद्ध पुकारले होते. दरम्यान हे युद्ध अजूनही चालू असून यामध्ये दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे.