Volodymyr Zelenskyy on Vladimir Putin Health : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी एका खळबळजनक दावा केला आहे. झेलेन्स्की यांना रशिायचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा लवकरच मृत्यू होईल आणि याबरोबरच दोन्ही देशातील युद्ध संपुष्टात येईल असा दावा केला आहे. झेलन्स्की यांवी गेल्या काही दिवसांपासून पुतिन यांच्या प्रकृतीबद्दल सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांदरम्यान पॅरिस येथे एका मुलाखतीत बोलताना हा दावा केला आहे.
फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांची बुधवारी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना झेलेन्स्की म्हणाले की, “त्यांचा (पुतीन) लवकरच मृत्यू होईल आणि ही खरी गोष्ट आहे, याबरोबरच हे (युद्ध) संपुष्टात येईल.”
पुतिन यांच्या प्रकृतीबद्दल अफावा
गेल्या काही महिन्यांपासून पुतिन यांच्या आरोग्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा आणि अफवा पसरताना पाहायला मिळत आहे. यातच पुतिन यांचे सतत खोकला येत असल्याचे आणि त्यांचे हातपाय विनाकारण हालत असल्याचे व्हिडीओ समोर आल्याने या अफवांमध्ये आणखी भर पडली आहे. २०२२ मध्ये समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये माजी सरंक्षण मंत्री रर्गेई शोईगू यांच्याबरोबरच्या एका बैठकी दरम्यान पुतीन टेबलाला पकडून मान खाली घालून खुर्चीवर बसल्याचे दिसून आले होते.
तसेच पुतिन यांना पार्किन्सन आजार झाल्याचे आणि ते कर्करोगाशी झुंज देत असल्याचा दावा देखील काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. पण या दाव्यांना अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. इतकेच नाही तर रशियन सरकारने हे दावे वेळोवेळा फेटाळून लावले आहेत.
युक्रेनचे नेते झेलेन्स्की यांनी शांततेचा प्रस्ताव फेटाळून लावत रशियाने दोन देशांमधील संघर्ष लांबवल्याचा आरोप केला आहे. “रशियाला हे युद्ध सुरू ठेवायचे आहे. ते हे (युद्ध) पुढे ढकलत आहे. खरोखर हे युद्ध संपावे यासाठी आपण रशियावर दबाव टाकण्याची आवश्यकता आहे,” असेही झेलेन्स्की यावेळी म्हणाले.
दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरूच
युक्रेन आणि रशिया यांच्यात ३० दिवस ऊर्जा स्त्रोतांवर हल्ला न करण्याबाबत एकवाक्यता झाल्यानंतर झेलेन्स्की यांनी हा दावा केला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेने युद्ध विरामासाठी मध्यस्थी केल्यानंतरही देन्ही देशांमध्ये एकमेकांवर ड्रोन हल्ले सुरूच राहिले आहेत.
युक्रेनने दावा केला आहे की, रशियाने या आठवड्यात ११७ ड्रोन हल्ले केले आहेत. तीन वर्षांपूर्वी सुरू झाल्यापासून झेलेन्स्की यांचे मुळ शहर Kryvyi Rih वर आजवरचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला करण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तर दुसरीकडे रशियाने दावा केला की युक्रेनने क्रिमियामधील गॅस साठवणूक केंद्र आणि कुर्स्क आणि ब्रायन्स्क भागातील ऊर्जेशी संबंधित केंद्रांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी ९ युक्रेनियन ड्रोन नष्ट केल्याचा दावाही केला आहे.