संपूर्ण ताकदीनिशी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने धुव्वा उडवला आणि बंगालमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर भाजपाच्या विरोधकांसह पंतप्रधान मोदींनी व भाजपाच्या काही नेत्यांनीही विजयाबद्दल ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या. पण, पश्चिम बंगालमधील भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांनी मात्र ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा देण्यास नकार दिला. इतकंच नाही तर क्रूर महिलेला पुन्हा सत्तेवर आणून पश्चिम बंगालच्या मतदारांनी ऐतिहासिक चूक केल्याची टीकाही सुप्रियो यांनी केली.
रविवारी मतमोजणी सुरू असताना ममता बॅनर्जी या पुन्हा सत्तेवर येणार हे स्पष्ट झाल्यानंतर बाबुल सुप्रियो यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. “मी ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा देणार नाही किंवा मी जनादेशाचा आदर करतो असंही म्हणणार नाही…भाजपाला संधी न देऊन बंगालच्या जनतेने भ्रष्ट, असमर्थ, अप्रामाणिक सरकार आणि एका क्रूर महिलेला पुन्हा सत्तेत आणून ऐतिहासिक चूक केली आहे”, अशी पोस्ट सुप्रियो यांनी केली.
“कायद्याचं पालन करणारा नागरीक म्हणून एका लोकशाही असलेल्या देशातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयाचे मी पालन करेन”, असंही सुप्रियो यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलं. थोड्याचवेळात या पोस्टवरुन टीका होण्यास सुरूवात झाल्यानंतर मात्र त्यांनी ही फेसबुक पोस्ट डिलिट केली.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ताशिखर गाठले. पश्चिम बंगालप्रमाणेच आसाम आणि केरळमध्ये मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल दिला. तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये मात्र सत्तांतर झाले.