नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमवारी ९६ टक्के मतदान झाले. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार शशी थरूर यापैकी कौल कुणाला मिळतो, हे बुधवारी मतमोजणीतून स्पष्ट होईल. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रदेश काँग्रेस प्रदेश समित्यांच्या ९,९०० प्रतिनिधींपैकी ९,५०० प्रतिनिधींनी मतदान केले. अनेक छोटय़ा राज्यांत १०० टक्के, तर मोठय़ा राज्यांत जवळपास ९० टक्के मतदान झाले, अशी माहिती पक्षाच्या केंद्रीय निवडणूक विभागाचे अध्यक्ष मधुसुदन मेस्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सर्व राज्यांत मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. निवडणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणूक पारदर्शक आणि शांततेत पार पडली, असे मेस्त्री यांनी सांगितले. पक्षांतर्गत लोकशाही कशी असते, याचा वस्तुपाठ काँग्रेसने घालून दिला असून, इतर पक्षांनी त्यातून धडा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सध्या ‘भारत जोडो’ यात्रेत असलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून मतदान केले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात मतदान केले. ‘‘मला दिर्घकाळापासून या क्षणाची प्रतीक्षा होती’’, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत आहे. खरगे यांना अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा आहे. मात्र, शशी थरूर यांनीही राज्याराज्यांत प्रचार करून समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यात कोण बाजी मारणार, हे बुधवारी स्पष्ट होईल. त्यातून अडीच दशकांत पहिल्यांदा काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे.