नवी दिल्ली : झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, त्रिपुरा, केरळ, पश्चिम बंगाल या सहा राज्यांतील ७ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार असून विरोधकांच्या ‘इंडिया’ची ही पहिला परीक्षा असेल. झारखंड, त्रिपुरा व उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये ‘इंडिया’चा संयुक्त उमेदवार असून केरळ व पश्चिम बंगालमध्ये घटक पक्षांमध्ये लढत होत आहे.
झारखंडमधील डुमरी मतदारसंघामध्ये झारखंड मुक्ती मोच्र्याचा उमेदवार रिंगणात असून काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्रिपुरामध्ये बोक्सानगर व धनपूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘माकप’ने उमेदवार उभे केले असून काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये घोसी मतदारसंघामध्ये सप उमेदवाराविरोधात काँग्रेस तसेच अन्य प्रादेशिक पक्षांनी उमेदवार दिला नाही. या विधानसभा मतदारसंघांमध्ये विरोधकांच्या महाआघाडीचे पारडे जड आहे.
हेही वाचा >>>गांधीजींच्या मार्गाने विश्वशांतीचे ध्येय गाठणे शक्य! राष्ट्रपती मुर्मू यांचा विश्वास
केरळमध्ये पुथुपल्ली मतदारसंघामध्ये काँग्रेस व माकप एकमेकांविरोधात लढतील. ही जागा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमान चंडी यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. उत्तराखंडमध्ये बागेश्वर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असतानाही समाजवादी पक्षाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे इथे तिरंगी लढत होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये धुपगुडी मतदारसंघामध्ये माकपला काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.