नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार बुधवारी, २४ एप्रिल रोजी संपणार असून या टप्यात पश्चिम उत्तर, राजस्थान, बेंगळुरू शहरातील मतदारसंघांमध्ये इतर मुद्द्यांसह ध्रुवीकरणाचा मुद्दाही कळीचा ठरू शकेल. त्यामुळेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यस्थान व उत्तर प्रदेशमधील प्रचारसभांमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून हिंदू-मुस्लिम मुद्दा ऐरणीवर आणल्याचे मानले जात आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आक्रमक
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारामध्ये पहिल्या टप्प्यापासून ध्रुवीकरण झालेले पाहायला मिळाले आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये बालुरघाटमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार पुन्हा लढत आहेत.
पूर्णियामध्ये पप्पू यादव बंडखोर
बिहारमधील पूर्णियात नुकतेच काँग्रेसवासी झालेले पप्पू यादव यांनी बंडखोरी केली आहे. जागावाटपात पूर्णिया राष्ट्रीय जनता दलाला मिळाले. पण, पूर्णियावरील हक्क पप्पू सोडायला तयार नसल्यामुळे काँग्रेसची पंचाईत झाली आहे.
हेही वाचा >>>नेते गेले तरी कार्यकर्ते काँग्रेसबरोबरच! ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत खरगे यांच्याकडून सत्ताबदलाचा विश्वास
भूपेश बघेल पुन्हा लोकसभेच्या रिंगणात
छत्तीसगढमधील राजनंदगाव मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे उमेदवार भूपेश बघेल पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
कर्नाटकमध्ये चुरस
कर्नाटकमध्ये दक्षिण बेंगळुरूमध्ये भाजपचे वादग्रस्त नेता तेजस्वी सूर्या लढत आहेत. बेंगळुरू उत्तरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदळजे यांच्याविरोधात काँग्रेसचे कर्नाटकमधील मंत्री राजीव गौडा, बेंगळुरू ग्रामीणमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश लढत आहेत. मंड्यामध्ये जनता दलाचे (ध) नेते एच. डी. कुमारस्वामी तर, म्हैसूरमधून राजघराण्यातील यदुवीर वडियार रिगणात आहेत.
केरळमध्ये राहुल गांधी, वेणुगोपाल, थरूर, मुरलीधरन
केरळमध्ये राहुल गांधींमुळे वायनाडमधील लढत लक्षवेधी ठरली असून भाकपच्या अॅना राजा व भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्यामुळे इथे तिहेरी लढत होईल. थिरुवनंतपूरममध्ये काँग्रेसचे शशी थरूर विरुद्ध केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर ही लढत तुल्यबळ होण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये शेखावत, बिर्ला
राजस्थानमध्ये टोंक-सवाई माधवपूर, अजमेर, जोधपूर, बारमेर, जालोर, उदयपूर, चित्तोडगढ, राजसमंद अशा काही मतदारसंघांमध्येही ध्रुवीकरणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो. जोधपूरमधून केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, कोटामधून विद्यामान लोकसाध्यक्ष ओम बिर्ला यांना पुन्हा संधी मिळालेली आहे.
मथुरेत हेमा मालिनी, मेरठमध्ये अरुण गोविल
उत्तर प्रदेशमध्ये मथुरा, मेरठ, गाझियाबाद, अलिगढ, अमरोहा, बागपत, गौतमबुद्ध नगर, बुलंदशहर या मतदारसंघांमध्ये शुक्रवारी २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून इथे ध्रवीकरणाचा भाजपला लाभ मिळू शकतो. मुथरेमधून भाजपने पुन्हा हेमामालिनी यांना उमेदवारी दिली आहे. मेरठमधून रामाचे पात्र रंगवणारे अरुण गोविल रिंगणात उतरले आहेत. गौतमबुद्धनगर (नोएडा) भाजपचे महेश शर्मा यांच्यामुळे लक्षवेधी ठरली आहे.
१३ राज्यांत ८९ जागा
● केरळ (२०), कर्नाटक (१४), राजस्थान (१३), महाराष्ट्र व उत्तर प्रदेश (प्रत्येकी ८), मध्य प्रदेश (७), आसाम व बिहार (प्रत्येकी ५), छत्तीसगड व पश्चिम बंगाल (प्रत्येकी ३), आणि जम्मू-काश्मीर, मणिपूर व त्रिपुरा (प्रत्येकी १).
● पहिल्या फेरीमध्ये तामीळनाडूमधील ( जागा) मतदान पूर्ण झाले असून दुसऱ्या फेरीत केरळ (२०) व राजस्थान (२६) या दोन राज्यांमधील मतदान पूर्ण झालेले असेल.