Delhi MCD Election On 4th December : दिल्ली महापालिका निवडणकीच्या तारखांची आज(शुक्रवार) निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार ४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि ७ डिसेंबर रोजी निकाल असणार आहे.

दिल्ली राज्य निवडणूक आयुक्त विजय देव म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिसूचना ७ नोव्हेंबर रोजी जारी होईल. उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर आहे. निवडणुकीसाठी मतदान ४ डिसेंबर आणि निकाल ७ डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल. निवडणुकीच्या घोषणेबरोबरच आचारसंहिता लागू होणार आहे.

हेही वाचा – MCD election : “दिल्लीत एकही भाजपावाला राहणार नाही, सर्वांचं….”; अरविंद केजरीवालांचं विधान

दिल्लीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापताना दिसत आहे. भाजपा आणि आम आदमी पार्टी यांच्यात सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. आता दिल्लीतील कचऱ्याच्या मुद्द्यावरून राजकारण रंगलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत गाझीपुर लँडफिल येथे जाऊन भाजपावर निशाणा साधला. १५ वर्षांमध्ये भाजपाने दिल्लीवासीयांना कचऱ्याचे मोठे डोंगर दिले, असं केजरीवाल म्हणाले आहेत.