एपी, इस्तंबूल : तुर्कस्तानमध्ये होत असलेल्या अध्यक्षीय आणि संसदीय निवडणुकांच्या पूर्वसंध्येला शनिवारी प्रचार संपण्यास अखेरचे काही तास उरलेले असताना राजकीय प्रचारसभा, प्रचाराच्या इतर रणधुमाळी रंगली होती. तुर्कस्थानच्या भवितव्यासाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे.
तुर्कस्तानचे विद्यमान अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन आपल्या दोन दशकांच्या सत्ताकाळानंतर आतापर्यंतच्या सर्वात कठीण आव्हानाला तोंड देत आहेत. तुर्कस्तानमधील सर्वात मोठे शहर इस्तंबूल येथे प्रचारसभांना त्यांनी संबोधित केले. धर्मनिरपेक्ष मूल्यांचे समर्थक रिपब्लिकन पीपल्स पक्षाचे केमाल किलिकदारोग्लू हे एर्दोगन यांचे अध्यक्षपदासाठीचे प्रतिस्पर्धी आहेत. किलिगदारोग्लू हे सहा विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार आहेत. त्यांनी राजधानी अंकारा येथे शुक्रवारी मुसळधार पावसात त्यांची अंतिम प्रचारसभा घेतली.
आपण हारल्यास सत्ता सोडणार नाहीत, हा कयास फेटाळून लावताना एर्दोगन यांनी हा कयास अप्रस्तुत आणि चुकीचा असल्याचे सांगितले. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, एर्दोगन म्हणाले की आपण सत्तेवर लोकशाही मार्गानेच आलो आहोत. आपण सदैव लोकशाही मूल्यांनुसार व प्रक्रियेनुसारच काम करणार आहोत.
लोकशाही आणि लोकशाही प्रक्रियेनुसार कार्य करेल. जर आपल्या राष्ट्राने वेगळा कौल द्यायचे ठरवल्यास आम्ही ते स्वीकारू. देशास जे मान्य असेल तसेच आम्ही करू. याला दुसरा पर्याय असूच शकत नाही. या निवडणुका आपल्या देशाचे भवितव्य निश्चित करणारा लोकशाहीचा उत्सव आहे. तसेच आपले विरोधक देशाला समर्थ नेतृत्व देण्यास सक्षम नसल्याचा दावा त्यांनी चित्रफितीद्वारे केला. विरोधकांच्या प्रचारात इस्तंबूलचे प्रसिद्ध महापौर एकरेम इमामोग्लू हे सहभागी झाले होते. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यांत झालेल्या सभांमधून त्यांनी किलिकदारोग्लू यांना मतदान करण्याचे आवाहन केले.