दुसरा टप्पा : उत्तर प्रदेशातही ५५ जागांसाठी निवडणूक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज, सोमवारी गोवा, उत्तराखंडमधील सर्व जागांसह उत्तर प्रदेशातील ५५ जागांसाठी मतदान होणार आह़े  या तिन्ही राज्यांत सत्ता राखण्याचे आव्हान भाजपपुढे आह़े

गोव्यातील ४० आणि उत्तराखंडमधील ७० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आह़े  गोव्यात ११ लाख, तर उत्तराखंडमध्ये ८१ लाख मतदार आहेत़  या दोन्ही राज्यांत याआधी दुरंगी लढत होत होती़  मात्र, यंदा गोव्यात सत्ताधारी भाजप आणि मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष रिंगणात उतरला आह़े  गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि मगोप या पक्षांची युती आह़े  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनीही निवडणूकपूर्व आघाडी जाहीर केली, तर आम आदमी पक्ष स्वबळावर लढत आह़े

 मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव (तृणमूल काँग्रेस), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), विजय सरदेसाई (गोवा फॉर्वर्ड पक्ष), सुदीन ढवळीकर (मगोप), माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल आदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत़  राज्यात २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक १७, तर भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या़  मात्र, भाजपने सत्तेचे गणित जमवून काँग्रेसला धोबीपछाड दिला होता़

उत्तराखंडची स्थापना २००० मध्ये झाल्यानंतरची ही पाचवी निवडणूक आह़े  राज्यात मतदानासाठी ११,६९७ मतदान केंद्रे आहेत़  मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, सत्पाल महाराज, सुबोध उनियाल, अरिवद पांडे, धनसिंह रावत आदी मंत्री रिंगणात आहेत़  काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री हरिश रावत, माजी मंत्री यशपाल आर्या आदी निवडणूक लढवत आहेत़  गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ७० पैकी ५७ जागांचे प्रचंड बहुमत मिळाले होत़े  काँग्रेसला केवळ ११ जागा जिंकता आल्या होत्या़    उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात ५५ जागांसाठी मतदान होणार असून, ५८६ उमेदवार रिंगणात आहेत़  सहारणपूर, बिजनौर, मोरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बरेली आणि शाहजहानपूर आदी जिल्ह्यांमध्ये हे मतदान होईल़  गेल्या निवडणुकीत भाजपने ५५ पैकी ३८ जागा जिंकल्या होत्या़ 

६० हजार पोलीस तैनात :  उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात ५००० संवेदनशील मतदान केंद्रे आहेत़  तिथे ६० हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत़  तसेच निमलष्करी दलाचे शेकडो जवान तैनात आहेत़

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voting today goa uttarakhand elections for 55 seats uttar pradesh too akp