पीटीआय, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (१९ एप्रिल) होणाऱ्या २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील १०२ मतदारसंघांमधील प्रचाराची बुधवारी संध्याकाळी सांगता झाली. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी या टप्प्यात मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांत मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या पाचही मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत पाचपैकी चार जागा भाजप-शिवसेना युतीने तर एक जागा काँग्रेसने जिंकली होती. यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ताकदीचे उमेदवार रिंगणात आहेत.
हेही वाचा >>>अडीच लाख महिना पगार सोडून UPSC ची तयारी केली आणि थेट देशात पहिला आला; आदित्य श्रीवास्तवचा अविश्वसनीय प्रवास!
पहिल्या टप्प्यातील प्रचारात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच वाहिली. गेल्या काही दिवसांत मोदी यांनी अनेक मतदारसंघांमध्ये झंझावाती प्रचारदौरे केले. अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या, रोड शोही केले. मोदी यांनी प्रत्येक सभेत, मतदारांना ‘मोदी गॅरंटी’चे आश्वासन दिले. ‘‘सर्व हमींची पुर्तता करण्याचीही मी हमी देत आहे,’’ याचा पंतप्रधानांनी जवळपास प्रत्येक सभेत पुनरुच्चार केला.
पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह मंत्रिमंडळातील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी राओलाच्या उमेदवारांचा प्रचार केला. तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार प्रामुख्याने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि खासदार राहुल गांधी यांनी केला.
‘मोदी हमी’ विरुद्ध ‘न्यायपत्र’
समाजातील विविध घटकांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजनांवर आधारित तयार केलेल्या भाजपच्या जाहिरनाम्यात ‘मोदी हमी’चा समावेश केला आहे. एक राष्ट्र, एक निवडणूक, समान नागरी कायदा या गेल्यावेळच्या निवडणुकीतील आश्वासनांचाही यावेळी पुनरुच्चार केला आहे. भाजपच्या ‘मोदी हमी’ला काँग्रेसने आपल्या ‘न्यायपत्र’ या जाहिरनाम्याद्वारे उत्तर दिले. काँग्रेसने न्यायपत्राद्वारे २५ हमी दिल्या आहेत. त्यांत आरक्षणाची मर्यादावाढ, एमएसपीचा कायदा, जातनिहाय जनगणना, अग्निपथ रद्द करणे आदी आश्वासने दिली आहेत.
भाजपचे प्रचारमुद्दे
इंडिया आघाडीतील नेत्यांचा कथित भ्रष्टाचार.
विरोधकांचे घराणेशाहीचे कथित राजकारण.
विरोधकांकडून हिंदू धर्म आणि संविधानाचा कथित अवमान. इंडिया आघाडीचे प्रचारमुद्दे
भाजपचा कथित निवडणूक रोखे गैरव्यवहार.
भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा कथित गैरवापर.
मोदी सरकारच्या कार्यकाळात वाढलेली महागाई, बेरोजगारी.