त्रिपुरातील एका सरकारी महाविद्यालयात सरस्वती पूजनाचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. परंतु, या कार्यक्रमात देवी सरस्वतीच्या मूर्तीला पारंपरिक साडी नेसवली नसल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि बजरंग दलाने केला. त्यामुळे या दोन्ही संघटनांनी महाविद्यालयाच्या या कृतीविरोधात निदर्शने केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे त्रिपुरा युनिटचे सरचिटणीस दिवाकर आचार्जी यांनी या निषेधाचे नेतृत्व केले. एनडीटीव्हीने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
“आपल्या सर्वांना माहीत आहे की, वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची देशभरात पूजा केली जाते. सकाळीच आपल्या सर्वांना बातमी मिळाली की, शासकीय आर्ट अॅण्ड क्राफ्ट महाविद्यालयात देवी सरस्वतीची मूर्ती अत्यंत चुकीच्या आणि असभ्य पद्धतीने साकारण्यात आली आहे”, असे आचार्जी म्हणाले.
हेही वाचा >> शेतकऱ्यांवर रबरी गोळ्यांचा मारा; ४० आंदोलक जखमी, केंद्रीय मंत्र्यांची आज तोडग्यासाठी चर्चा
देवी सरस्वतीच्या मूर्तीला पारंपरिक साडी नेसवण्यात आली नव्हती. त्यामुळे याविरोधात सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यानंतर याबाबत बजरंग दलाला माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनीही या निदर्शनात सहभाग नोंदविला. दरम्यान, आंदोलकांनी या मूर्तीला साडी नेसवण्यास भाग पाडले.
कॉलेजचं स्पष्टीकरण काय?
परंतु, महाविद्यालय प्रशासनाने आंदोलकांचा आरोप फेटाळून लावला. हिंदू मंदिरात पाळल्या जाणाऱ्या पारंपरिक शिल्पकलेचे पालन ही मूर्ती घडविण्याच्या वेळी करण्यात आले होते. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. अखेर ही मूर्ती महाविद्यालय प्रशासनाने बदलली असून, प्लास्टिक आवरणाने झाकली आहे.
मुख्यमंत्र्यांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून महाविद्यालय प्राधिकरणाविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) संलग्न विद्यार्थी संघटना यांनी केली.
तसेच घटनास्थळी पोलिसांनीही भेट दिली. परंतु, महाविद्यालयाने निदर्शकांविरोधात कोणतीही तक्रार केली नाही. किंवा अभाविप आणि बजरंग दलानेही महाविद्यालयाच्या विरोधात कोणतीही औपचारिक तक्रार केली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.