अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खरेदी करण्यात आलेल्या ३६०० कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर खरेदीत लाच घेतल्याचा आरोप असलेले माजी हवाईदलप्रमुख एस. पी. त्यागी आणि अन्य भारतीयांची बँक खाती सीबीआयने गोठविली आहेत.
या खरेदी व्यवहारात ज्या भारतीय आरोपींची नावे एफआयआरमध्ये आहेत त्यांची काही बँक खाती सीबीआयने गोठविली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एअरोमॅट्रिक्स इन्फो सोल्यूशन्स प्रा. लि. आणि आयडीएस इन्फोटेक या भारतीय कंपन्यांची बँक खाती यापूर्वीच गोठविण्यात आली आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.
त्याचप्रमाणे तपासाचा एक भाग म्हणून त्यागी यांचे चुलते संजीव ऊर्फ ज्युली, राजीव ऊर्फ डोक्सा आणि संदीप यांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. माजी केंद्रीयमंत्री संतोष बागरोडिया यांचा भाऊ सतीश, आयडीएस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप अग्रवाल, एअरोमॅट्रिक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण बक्षी आणि कायदेविषयक सल्लागार गौतम खेतान यांचीही खाती गोठविण्यात आली आहेत.

Story img Loader