मिझोरम विधानसभेच्या ४० जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. सत्तारुढ काँग्रेस विरुद्ध मिझोराम लोकशाही आघाडी यांच्यात थेट मुकाबला आहे. एकूण १४२ उमेदवार रिंगणात आहे. सीमेलगत काही मतदारसंघ असल्याने कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
देशात पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट पद्धतीचा वापर या निवडणुकीच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणात करण्यात येणार आहे. दहा मतदारसंघांत हा प्रयोग केला जाणार आहे. यामध्ये व्हीव्हीपॅट मतदान यंत्राला जोडलेले असते, मतदाराला आपण टाकलेले मत आपल्याला अपेक्षित असलेल्या उमेदवारालाच गेले आहे काय हे यातून समजते. मिझोराममधील चाळीसपैकी ३९ जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. काँग्रेस आणि मिझोराम लोकशाही आघाडीने सर्व चाळीस जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काँग्रसचे नेते मुख्यमंत्री लालथनहावला दोन मतदारसंघांतून लढवत आहेत. २००८ मध्ये काँग्रेसने ३२ जागा जिंकल्या होत्या. सहा महिला उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी भाजपने तीन महिलांना संधी दिली आहे. राज्यात सहा लाख ९० हजार ८६० मतदार असून ११२६ मतदान केंद्रे आहेत.