शनिवारी सकाळीच रशियात वॅग्नर या पुतिन यांच्या समांतर सैन्यगटानं बंड केलं. या गटाचा प्रमुख प्रिगोझिननं थेट पुतिन यांनाच आव्हान देत मॉस्कोच्या दिशेनं सैन्याला आगेकूच करण्याचे आदेश दिले. त्यामुळे रशियात खुद्द पुतिन यांना आजपर्यंतचं सर्वात मोठं आव्हान आणि धोका निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं. वॅग्नर ग्रुपचे सैनिक रशियातील वेगवेगळ्या शहरांमधून मार्च करत ती शहरं ताब्यात घेतल्याचा दावा करत होते. या पार्श्वभूमीवर रशियात विध्वंस होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र, त्याआधील बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला आणि पुढील सर्व गोष्टी टळल्या. मात्र, दोन्ही बाजूंनी नेमका कोणत्या अटींवर तह झाला?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“रशियात रक्तपात न होणं हेच सर्वोच्च ध्येय”

प्रारंभी या बंडामध्ये जे जे गुंतले असतील, त्या सर्वांना शिक्षा करण्याची आक्रमक भाषा करणारे पुतिन या तहामध्ये काहीशी मवाळ भूमिका घेताना दिसले. बंड करणाऱ्या वॅग्नर ग्रुपला किंवा त्या ग्रुपचा प्रमुख प्रिगोझिनला देशद्रोह किंवा इतर कोणत्याही कायदेशीर कारवाईपासून अभय देण्यास पुतिन यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता हा ग्रुप आणि स्वत: प्रिगोझिन रशियातून निर्भयपणे आपल्या तळावर परतू शकतो. “रशियामध्ये रक्तपात आणि अंतर्गत लढा होऊ नये हेच पुतिन यांचं सर्वोच्च ध्येय होतं. म्हणून त्यांनी प्रिगोझिन आणि त्याच्या सैन्याला जाऊ दिलं”, असं स्पष्टीकरण पुतिन सरकारकडून देण्यात आलं आहे.

कशा झाल्या वाटाघाटी?

बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेंको हे पुतिन यांचे जवळचे मित्र मानले जातात. बेलारूसमध्ये आपल्या सरकारची पकड घट्ट करण्यासाठी ल्युकाशेंको यांना पुतिन यांनी सर्व मदत केली आहे. त्यामुळेच ल्युकाशेंको हे युरोपमधले आत्तापर्यंतचे सर्वाधिक काळ राष्ट्राध्यक्षपदी राहिलेले व्यक्ती ठरले आहे. बेलारूसमध्ये १९९४पासून ल्युकाशेंकोच राष्ट्राध्यक्षपदी आहेत.

वॅग्नर नरमले, रशियातील संभाव्य विध्वंस टळला; मॉस्कोच्या आधीच प्रिगोझिननं सैन्याला थांबवलं!

रशियातील या सर्व वादात सुरुवातीपासूनच ल्युकाशेंको यांनी पुतिन यांच्या बाजूने भूमिका मांडली होती. अखेर वॅग्नर ग्रुप वेगाने मॉस्कोच्या दिशेने सरकत असल्याचं पाहाता ल्युकाशेंको यांनी या वादात मध्यस्थीची तयारी दाखवली. त्यानुसार, पुतिन यांच्या सहमतीने ल्युकाशेंको यांनी प्रिगोझिनशी वाटाघाटी सुरू केल्या.

वॅग्नर रस्त्यावर, प्रिगोझिन वाटाघाटीत!

दरम्यान, ल्युकाशेंको यांनी जाहीर केलेल्या निवेदनानुसार, शनिवारी सकाळीच त्यांनी पुतिन यांच्याशी या सर्व वादावर चर्चा करून प्रिगोझिनशी चर्चा करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. एकीकडे वॅग्नर ग्रुपचे सैनिक मॉस्कोच्या दिशेनं मार्च करत असताना दुसरीकडे प्रिगोझिन ल्युकाशेंको यांच्याशी रशियातील संभाव्य परिस्थितीबाबत वाटाघाटी करत होता. शनिवारी दिवसभर या वाटाघाटी चालल्याचं ल्युकाशेंको यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे.

या वाटाघाटी पार पडल्यानंतर ल्युकाशेंको यांनी जाहीर केलेल्या या निवेदनात प्रिगोझिन सैन्य माघारी घेण्यास तयार झाल्याचं म्हटलं आहे. “रशियामध्ये रक्तपात सुरू करणं हे कोणत्याही परिस्थितीत अमान्य असल्याची भूमिका दोन्ही बाजूंनी घेतली. त्यानुसार, वॅग्नर ग्रुपला माघारी फिरण्याचे आदेश देण्यात आले आहेत”, असंही जाहीर करण्यात आलं.

वाटाघाटी, तह आणि अटी!

दरम्यान. थेट पुतिन यांनाच आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धोका निर्माण करणारं हे बंड काही मोजक्याच अटींवर थंड झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या तहानुसार, प्रिगोझिन व त्यांच्या वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांवर देशद्रोह किंवा इतर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. पुतिन यांनी सर्वांना शिक्षा करण्याची भूमिका जाहीर करूनही ही अट मान्य करण्यात आली आहे.

विश्लेषण: ‘वॅग्नर ग्रुप’चा भस्मासुर रशियावरच उलटणार? भाडोत्री लष्कराचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ!

या तहानुसार, रशियात घुसलेलं वॅग्नर ग्रुपचं सैन्य माघारी फिरून पुन्हा युक्रेनमधील आपल्या नियोजित तळावर रुजू होईल. तसेच, ग्रुपचा प्रमुख प्रिगोझिन हा बेलारूसमध्ये निघून जाईल, असंही तहानुसार मान्य करण्यात आलं आहे.

वॅग्नर ग्रुपमधल्या ज्या सैनिकांनी या बंडामध्ये सहभाग घेतला नाही, त्यांना रशियन संरक्षण मंत्रालयाकडून नोकरीची संधी देण्यात येईल, असं पुतिन सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wagner group in russia prigozhin agree to retreat lukashenko vladimir putin pmw
Show comments