रशियानं युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यापासून सातत्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आक्रमक भूमिका घेताना दिसून आले. मात्र, युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच पुतिन बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. आपल्या विरोधकांचा सामना करण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांनी तयार उभा केलेला वॅग्नर हा सशस्त्र सैनिकांचा ग्रुप आता त्यांच्याच विरोधात उभा ठाकला आहे. वॅग्नरनं रशियात बंड केलं असून रशियात नवीन राष्ट्राध्यक्षांची नियुक्ती करण्याची घोषणाच वॅग्नरचा प्रमुख झिबिग्नी प्रिगोझिव्ह यानं केली आहे. त्यामुळे एकीकडे पुतिन यांच्या अडचणी वाढत असताना त्यांनी अडचणीत टाकलेले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियातील परिस्थितीवर खोचक ट्वीट केलं आहे.
रशियात नेमकं काय घडतंय?
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तयार केलेल्या वॅग्नर या ग्रुपनं आत्तापर्यंत पुतिन यांना सर्व प्रकारच्या कारवायांमध्ये साथ दिली. अगदी अलिकडेच रशियानं सुरू केलेल्या युक्रेन युद्धातही वॅग्नर ग्रुप रशियन सैन्याच्या बरोबरीने युक्रेनमध्ये कारवाया करत होता. मात्र, याच काळात या दोन्ही सैन्यामध्ये काही खटके उडाल्याचं समोर आलं होतं. वॅग्नरचा प्रमुख प्रिगोझिव्हनं रशियन सैन्यदलाच्या प्रमुखावर फसवणुकीचा आरोप केला होता. युक्रेनमध्ये रशियन सैन्याच्या पीछेहाटीवरही दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप करण्यात आले होते. या कलहाचं रुपांतर अखेर शनिवारी वॅग्नरच्या बंडामध्ये झालं.
पुतिन यांचा इशारा
एकीकडे वॅग्नरचा प्रमुख प्रिगोझिव्हनं रशियाला नवा राष्ट्राध्यक्ष देण्याची घोषणा केली असताना दुसरीकडे पुतिन यांनी मात्र सडेतोड उत्तराची भाषा केली आहे. ‘त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यांना याची शिक्षा मिळेल’, असं पुतिन यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आत्तापर्यंत युक्रेनवर आक्रमणासाठी आक्रमक होणाऱ्या रशियातच त्यांच्या दोन्ही सैन्यतुकड्या एकमेकांविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
झेलेन्स्की यांचं खोचक ट्वीट
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून पुतिन यांच्या आक्रमक धोरणाचा धीरानं सामना करणाऱ्या युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियातल्या परिस्थितीवर खोचक शब्दांत भाष्य केलं आहे. “रशियाचा हा कमकुवतपणा हे तर अगदी साहजिक होतं. हा सरळ सरळ कमकुवतपणाच आहे. आता रशिया जितका अधिक काळ युक्रेनमध्ये त्यांचं सैन्य आणि हे भाडोत्री सैनिक ठेवेल, तेवढा जास्त गोंधळ, दु:ख आणि अडचणींचा सामना रशियाला करावा लागेल. हे तर साहजिकच आहे. रशियाच्या दुष्ट आणि गोंधळाच्या धोरणांपासून युरोपचं संरक्षण करण्यासाठी युक्रेन समर्थ आहे”, असं झेलेन्स्की म्हणाले आहेत.
“ज्यानं दुष्ट वृत्तीचा मार्ग स्वीकारला, त्यानं शेवटी स्वत:चाच विनाश ओढवून घेतला आहे. इतर देशात सैन्य पाठवणारे आणि समोर संकट उभं राहिल्यानंतर त्यापासून पळ काढणाऱ्या सैन्याला रोखू न शकणाऱ्यांचं हेच होतं. जो इतरांना क्षेपणास्त्रांनी घाबरवण्याचा प्रयत्न करतो आणि ते आम्ही पाडल्यानंतर स्वत:वरच ड्रोन हल्ल्याचा कांगावा करतो त्याचं हेच होणार. जो लाखो नागरिकांना युद्धामध्ये ढकलतो आणि शेवटी स्वत:च त्याच्याच सैन्यापासून बचावासाठी मॉस्कोमध्ये स्वत:ला कोंडून घेतो, त्याचं हेच होणार”, असंही झेलेन्स्की यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“पुतिन यांनी चूक केली, आता रशियाला लवकरच…”, बंडखोर वॅग्नर लष्कराचा इशारा
“रशियानं कायमच आपला कमकुवतपणा लपवला”
दरम्यान, रशियानं नेहमीच आपला कमकुवतपणा लपवल्याची टीका झेलेन्स्की यांनी केली आहे. “गेल्या कित्येक वर्षांपासून रशियानं आपला कमकुवतपणा व मूर्खपणा लपवला आहे. आता तिथे एवढा गोंधळ झालाय की कोणताही खोटारडेपणा हा गोंधळ लपवू शकत नाही. आणि हे सगळं एका व्यक्तीमुळे होत आहे”, असं म्हणत झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्यावर हल्लाबोल केला आहे.