भारताच्या लष्कराला आता अत्याधुनिक रायफली मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्तर प्रदेश इथल्या अमेठी इथे रशियाचे तंत्रज्ञान असलेल्या एके-२०३ ( AK-203 ) या जगातील अत्याधुनिक स्वयंचलित रायफलींच्या उत्पादनाला अखेर सुरुवात झाली आहे. लष्कराकडे सध्या INSAS ( Indian Small Arms System ) प्रकारातील रायफली असून आता त्याची जागा आधुनिक एके-२०३ घेणार आहे.
एके-२०३ स्वयंचलित रायफलींचे उत्पादन करणाऱ्या कारखान्याचे भूमिपूजन अमेठी इथे पंतप्रधान मोदी यांनी २०१९ मध्ये केले होते. तर एके-२०३ रायफलींच्या तंत्रज्ञान हस्तांतरणाचा, सुमारे पाच हजार कोटींचा करार डिसेंबर २०२१ मध्ये करण्यात आला होता. आता अमेठीमध्ये पुढील काही वर्षात सहा लाखांपेक्षा जास्त एके-२०३ रायफलींचे उत्पादन केले जाणार आहे.
सुरुवातीला एके-२०३ रायफलमध्ये फक्त पाच टक्के स्वदेशी घटक असतील. मात्र पुढील ३ वर्षात पहिल्या टप्प्यातील ७० हजार रायफलींचे उत्पादन करतांना यामधील स्वदेशी टक्का वाढवला जाईल. त्यानंतरचे रायफलचे हे उत्पादन हे १०० टक्के भारतीय असणार आहे.
हेही वाचा… अखेर पाकिस्ताननं मान्य केली चूक, पंतप्रधान शरीफ म्हणाले, “भारताशी तीन युद्ध लढल्यानंतर…”
एके-२०३ ( AK-203 )चे महत्व काय?
सध्या लष्कर स्वदेशी बनावटीची INSAS या प्राथमिक रायफलीचा वापर करते, मात्र याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर ती आता टप्प्याटप्प्यातून सेवेतून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची जागा घेणारी एके-२०३ रायफल ही सध्याच्या काळातील रायफल प्रकारातील सर्वात अत्याधुनिक रायफल म्हणून ओळखली जाते. रशियाचे लष्कर या रायफलीचा नियमित वापर करत आहे.
वाळवंट, दाट जंगल ते लडाखसारखा अतिथंड भागात भारताचे लष्कर हे तैनात असते. तेव्हा भारतातील अशा विभिन्न वातावरणात, तापमानात उत्कृष्ठ काम करण्याची क्षमता एके-२०३ ने सिद्ध केली आहे. रायफलच्या मॅगझिनमझध्ये ३० ते ५० गोळ्या सामावण्याची क्षमता असली तरी एका मिनीटात ७०० एवढ्या वेगाने गोळ्या डागण्याची-झाडण्याची या रायफलची क्षमता आहे. एवढंच नाही जास्ती जास्त ८०० मीटर अंतरापर्यंतच अचूक मारा करण्याची क्षमता या रायफलमध्ये आहे.