गेली नऊ वर्षे ज्या विमानवाहू युद्धनौकेची भारताला प्रतीक्षा होती, ती रशियाकडून खरेदी करण्यात आलेली ‘अ‍ॅडमिरल गोर्शकोव्ह’ अर्थात ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही युद्धनौका शनिवारी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री ए.के. अँटोनी यांच्या उपस्थितीत सेव्हमॅश या  रशियाच्या नौदल तळावर हा हस्तांतरण सोहोळा पार पडणार आहे.
नौदलात दाखल होताच ‘आयएनएस विक्रमादित्य’ भारताकडे कूच करू लागणार आहे.  भारताच्या नव्या युद्धनौकेचे स्वागत करण्यासाठी आयएनएस विराट ही युद्धनौका  ओमानकडे कूच करू लागली आहे.
विक्रमादित्य ही विमानवाहू नौका भारतात दाखल होताच कारवार येथे स्थिरावेल, अशी माहिती  नौदलाच्या सूत्रांनी दिली.
कमोडोर सुरज बेरी यांच्या नेतृत्वाखाली ‘विक्रमादित्य’ आपला भारताकडील प्रवास सुरू करेल. सुखोईसारखी अद्ययावत लढाऊ विमाने वाहण्याची या नौकेची क्षमता आहे.
यापूर्वी भारतीय नौदलात विराट ही युद्धनौका १९८७ पासून विमानवाहू युद्धनौका म्हणून कार्यरत होती, जी आता निवृत्तीच्या मार्गावर आहे.