Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित रेझिस्टंट फ्रन्ट या संघटनेचा हात असल्याचे समोर आले असून, भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे, पाकिस्तानी नागरिक मोठ्या संख्येने अटारी-वाघा सीमेवर भारत सोडण्यासाठी दाखल होत आहेत.

मी भारत कसा सोडू?

अशात भारत सोडण्यासाठी अटारी सीमेवर पोहचलेल्या वाजिदा खान यांना एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यांनी सांगितले की, “माझा पासपोर्ट भारतीय आहे आणि माझी मुले पाकिस्तानी आहेत. माझ्याकडे भारतीय पासपोर्ट असल्याने, मी माझ्या मुलांसोबत जाऊ शकत नाही. मी भारत कसा सोडू?”

मला भारताबाहेर जायचे आहे

वाजिदा खान म्हणाल्या, “मी भारतीय आहे. १० वर्षांपूर्वी माझे पाकिस्तानात लग्न झाले होते. माझी दोन्ही मुले भारतात जन्मली. पण, त्यांच्याकडे पाकिस्तानचा पासपोर्ट आहे. दोन महिन्यांपूर्वी, फेब्रुवारी महिन्यात, मी इथे कौटुंबिक भेटीसाठी आले होते. आता भारताने देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. माझा पासपोर्ट भारतीय आहे आणि माझी मुले पाकिस्तानी आहेत, मला भारताबाहेर जायचे आहे. मी कशी भारताबाहेर पडू? मला माझ्या मुलांसोबत जायचे आहे, पण कागदपत्रांच्या अडचणीमुळे हे मला शक्य नाही. आईने मुलांसोबत असणे खूप महत्वाचे आहे.” पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना वाजिदा खान यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

…तर खूप उपकार होतील

या प्रकरणाबाबत पुढे बोलताना वाजिदा खान म्हणाल्या, “आम्हाला, भारताचा पासपोर्ट असणाऱ्यांना सीमा ओलांडू देत नसल्याची कल्पना नव्हती. याबाबत आम्ही अधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे. जर सरकारने मला माझ्या मुलांसह सीमा ओलांडण्याची परवानगी दिली तर खूप मोठे उपकार होतील. मला येथून माझ्या मुलांसह सीमा ओलांडायची आहे.”

वाजिदा खान यांचे पती म्हणाले की, “माझी पत्नी भारतीय पासपोर्टधारक असल्यामुळे सीमा ओलांडू शकत नसेल तर माझ्या मुलांसाठी ते खूप कठीण होईल. दोन्ही मुले अल्पवयीन आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये काही प्रमाणात सवलत द्यावी किंवा काहीतरी उपाययोजना करावी अशी सरकारला विनंती आहे.”