पश्चिम बंगालमधून एक चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या पाच विद्यार्थ्यांनी ‘वॉलेट ट्रांझॅक्शन’ करून चार महिन्यांच्या कालावधीत एका खासगी बँकेतून ८.६ कोटी रुपये लंपास केले. या पाचही विद्यार्थ्यांना त्यांच्या अन्य चार साथीदारांसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता हे विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात असले तरी या घटनेमुळे बँकांच्या सुरक्षा प्रणालीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी बँकेने डिसेंबर २०१५ मध्ये ‘वॉलेट ट्रांझॅक्शन’ सेवा सुरू केली. परंतु, त्याच्या सुरक्षा प्रणालीत कमतरता असल्याचे सदर बँकेच्या लक्षात आले नाही. ज्या पाच विद्यार्थ्यांनी बँकेतून रोकड लंपास केली आहे त्यांच्या म्होरक्याचे नाव जीवल राणा असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणातील सीमकार्ड पुरवठ्याने तपासकर्ते हैराण आहेत. बँकेतून पैसे लंपास करण्यासाठी या टोळीने मुर्शिदाबाद जिल्ह्यात हजारो ‘प्रि-अॅक्टिवेटेड’ सीमकार्ड वाटली. भोळ्या ग्रामस्थांना बँकेत खाती उघडण्यास सांगण्यात आले. याबरोबरच त्यांना वॉलेट ट्रांन्झॅक्शन सुविधादेखील प्राप्त करून देण्यात आली, यासाठी टोळीतर्फे वाटण्यात आलेल्या सीमकार्डांचाच वापर करण्यात आला. सीमकार्ड घेणाऱ्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्याची खात्री देण्यात आली.
या प्रकरणी अधिक माहिती देताना गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त देबाशीष बोराल म्हणले की, टोळीचा म्होरक्या जीवल मुर्शिदाबादमधील मोबाइल सेवा पुरविणाऱ्या हबीबुर रहमानला ओळखत होता. कॉलेजमधील अन्य काही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यानेच ही योजना आखली. जीवलला हबीबुर रहमानने सीमकार्ड उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणाले.
खात्यातून कोणीतरी पैसे काढत असल्याची तक्रार बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने २३ डिसेंबर रोजी पहिल्यांदा केल्याचे पोलिसांनी सांगितले. कोलकाता आणि मुर्शिदाबाद येथून सीमकार्डच्या माध्यमातून या टोळीने बँकेत २००० खाती उघडल्याचे तपासात समोर आले. या खात्यांचा वापर करत त्यांनी १८ हजार मोबाइल वॉलेट आयडी तयार केली. या सर्वांचा वापर करत बँकेच्या पैशावर डल्ला मारला. प्रकरणाचा सर्व तपशील जाणून घेण्यास वेळ लागणार असून, तपास चालू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.