कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेचे कारण देऊन वॉल्ट डिस्ने कंपनीने बांगलादेश, पाकिस्तान आणि अन्य तीन देशांमधून पुढील एप्रिल महिन्यापर्यंत आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.बागंलादेशमध्ये गेल्या आठवडय़ात कारखान्याची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४०० जण ठार आणि २५०० हून अधिक जण जखमी झाले होते. त्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
ढाकामधील ताझरीन फॅशन कारखान्याला लागलेल्या आगीत ११२ जण मृत्युमुखी पडले, तर पाकिस्तानात लागलेल्या आगीत कापडाच्या कारखान्यातील २६२ कामगार मृत्युमुखी पडले. त्यामुळे हा निर्णय घेण्याचा विचार करावा लागला, असे डिस्ने कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
या निर्णयामुळे बांगलादेश आणि पाकिस्तानातील कापड निर्यात व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. युकॅडोर, व्हेनेझुएला आणि बेलारूसमधील उत्पादनही बंद करण्यात येणार आहे, असे डिस्ने ग्राहक उत्पादन कंपनीचे अध्यक्ष बॉब चॅपेक यांनी सांगितले.
जागतिक बँकेने दिलेल्या अहवालावर आधारित आमचा निर्णय आहे. विश्वासार्हता, भ्रष्टाचार, हिंसाचार याचे प्रमाण किती आहे आणि देशाचा कारभार कसा आहे, याबाबत पाहणी करून त्यावर अहवाल सादर करण्यात आला होता. या निकषांवर सदर पाच देश अत्यंत खालच्या स्तरावर आहेत, असेही ते म्हणाले.