काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेते गेल्या काही वर्षात बाहेर पडले आहेत. भाजपा पूर्ण ताकदीनिशी सत्तेवर आरूढ झाल्यानंतर अनेक राज्यातील मातब्बर नेते भाजपामध्ये किंवा एनडीएतील घटक पक्षात गेले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अशा नेत्यांवर परखड भाष्य केले आहे. “आसामचे मुख्यंमत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि मिलिंद देवरा यांच्यासारखे नेते पक्षातून निघून गेले तर चांगलंच आहे. ते पक्षाच्या विचारधारेशी एकरुप झाले नव्हते”, अशी टीका राहूल गांधी यांनी केली आहे.
हिमंता सर्मा यांनी २०१४ साली भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते आता आसामचे मुख्यमंत्री आहेत. तर माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी नुकताच एनडीएतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षात घुसमट होत असून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी पक्ष आग्रही नसल्याचे सांगून देवरा शिंदे गटात गेले.
मोठी बातमी! लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा
राहुल गांधी यांनी गुरुवारी (दि. १ फेब्रुवारी) पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पक्षाच्या ‘डिजिटल मीडिया वॉरियर्स’ मेळाव्याला संबोधित केले. काँग्रेसने कायम ठेवलेल्या तत्त्वांचे रक्षण करण्याच्या वचनबद्धतेवर कार्यकर्त्यांनी ठाम राहावे, यावर राहुल गांधी यांनी जोर दिला. राहुल गांधी यावेळी म्हणाले, “मला वाटतं हिमंता बिस्वा सर्मा आणि मिलिंद देवरा सारख्या नेत्यांनी पक्षातून निघून गेलेलं बरं. मला याबद्दल कोणतीही शंका नाही. हिमंता हे केवळ एका विषयाला धरून राजकारण करत आहेत. काँग्रेस असे राजकारण कधीही करत नाही.”
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही २५ जानेवारी रोजी आसाममधून पश्चिम बंगालमध्ये आली. शुक्रवारी ही यात्रा झारखंडमध्ये पोहोचली. “हिमंता सर्मा यांनी मुस्लीम समुदायाबाबत केलेली विधानं तुम्ही कधी ऐकली आहेत का? त्या विधानावर मी अधिक काही बोलणार नाही. काँग्रेसने काही तत्त्व पाळली आहेत, मी त्यांचे पालन करतो”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी सर्मा यांच्या विधानांवर टीका केली.
सर्मा आणि देवरा यांच्याप्रमाणेच ज्योतिरादित्य सिंदिया, जतीन प्रदास, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखर, प्रियांका चतुर्वेदी, हार्दिक पटेल, सुश्मीता देव आणि आरपीएन सिंह यांनी मागच्या काही वर्षात काँग्रेसपासून फारकत घेतली आहे.