एकेकाळी ‘नॅशनल जिऑग्राफिक’च्या अंकांच्या माध्यमातून ‘ताका’वर तहान भागविणारा, डिस्कव्हरी-फॉक्स ट्रॅव्हलर्सच्या जगदर्शनातून समाधान मानणारा भारतीय कालबाह्य़ झाला असून, दर वर्षी ‘सीमोल्लंघन’ करणाऱ्या या देशातील दीड कोटी पर्यटकांचा ओघ आपल्याकडे वळविण्यासाठी आफ्रिकेतील इथिओपिया देशाने कंबर कसली आहे.
होणार काय?
आफ्रिका खंडाच्या शिंगावर वसलेले इथिओपिया हे राष्ट्र ‘कम, व्हिजिट इथिओपिया’ या घोषवाक्यासह अप्रगत राष्ट्रांमधील पहिल्या पाच पर्यटन क्षेत्रांमध्ये स्वत:ची जडणघडण करीत आहे. भारतामधून दरवर्षी १ कोटी तीस लाख लोक परदेश भ्रमंतीसाठी जातात. त्यामुळे या मोठय़ा विस्तारत चाललेल्या बाजारपेठेमध्ये आम्हालाही वाटा मिळावा यासाठी इथिओपियाने तयारी सुरू केल्याचे, मुंबईतील इथिओपियाचे काऊन्सलेट जनरल गेनेट टेशोम यांनी सांगितले. भारतीय पर्यटकांना भुरळ पडेल, अशा इथिओपियातील पर्यटन क्षेत्रांची जाहिरात येत्या काही दिवसांत होणार असून, त्यासाठी भारतात विविध पर्यटन महोत्सव, प्रदर्शने घेतली जाणार आहेत. यावर्षी पुण्यामध्ये याबाबत प्रदर्शन घडविण्यात येणार आहे.
केले काय? आफ्रिकेतील अर्थविपन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोमालिया, सुदान, दक्षिण सुदान, केनया अशा राष्ट्रांभोवती वेढलेला इथिओपिया हे खंडामधील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्र आहे. सध्या मध्यपूर्वेतील राष्ट्रांपासून ते भारतापर्यंत पर्यटन ओढा थायलंड, मलेशिया, सिंगापूर, कंबोडिया येथे सर्वाधिक आहे. त्या वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी इथिओपियाने मूलभूत पर्यटन सुविधांमध्ये वाढ केली आहे. नवी दिल्लीमध्ये नुकतेच इथिओपियाने सांस्कृतिक केंद्र स्थापन केले असून, भारतातून इथिओपियात पर्यटन करता यावे यासाठी पर्यटन मंडळे उभारण्याचा मानस असल्याचे इथिओपियाचे पर्यटन आणि सांस्कृतिकमंत्री गेटेनेट यिगझॉ यांनी सांगितले.
आहे काय?
भारताप्रमाणेच इथिओपियाला संपन्न प्राचीन संस्कृती लाभलेली आहे. ऐतिहासिक, धार्मिक आणि पुरातत्त्व अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी स्थळे इथिओपियामध्ये आहेत. तीस लाख वर्षांपूर्वी मानव पहिल्यांदा चालू लागल्याचा पुरावा इथिओपियामध्ये सापडला आहे. २० राष्ट्रीय वने, चार भली मोठी संरक्षित वने, समृद्ध जैवसंपदा, १८ संरक्षित शिकार वने आदींनी इथिओपिया जगभरातील पर्यटकांना आधीच आकर्षित करीत आहे. डिस्कव्हरी, फॉक्स ट्रॅव्हलर्सच्या बहुतांश पर्यटन कार्यक्रमांमध्ये इथिओपिया गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटन समृद्ध आफ्रिकी राष्ट्र बनत चालले आहे.
नवे काय?
भारतीयांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रमुख शहरांमधून विमानसेवांतील वाढ, भारतीय खाद्यपदार्थ पुरवणारी हॉटेल्स, इथिओपिया आणि भारताच्या संस्कृतीचा संगम करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रचना यांद्वारे भारतीय पर्यटक पूर्वेकडच्या देशांइतकाच पश्चिमेकडच्या इथिओपियाकडे कसा वळेल, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मग पुढील वर्षीपासून इथिओपियाला जाणार?