Modi Birthday Special , 17 September : आज १७ सप्टेंबर म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७२वा वाढदिवस. जगातील प्रसिद्ध नेत्यांपैकी एक असलेल्या नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस दरवर्षी अतिशय धुमधडाक्यात साजरा केला जातो. ठिकठिकाणी वेगवेगळ्या लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. यंदा तर तामिळनाडू जिल्ह्यात आजच्या दिवशी जन्माला येणाऱ्या नवजात बालकांना भाजपातर्फे २ ग्राम सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली जाणार आहे. तसेच, दिल्लीमधील एका व्यावसायिकाने नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खास ५६ पदार्थ असणारी थाळी तयार केली आहे.
कोणाचाही वाढदिवस असल्यावर त्याला शुभेच्छा देण्याची सोपी पद्धत म्हणजे त्या व्यक्तीला छानसा संदेश पाठवणे. तुम्हालाही नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही ‘नमो अॅप’ची मदत घेऊ शकता. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त, तुम्ही रेकॉर्ड केलेले व्हिडीओ संदेश, फोटो आणि ‘सेवेची भेट’ यासह इतर काही खास मार्गांनी त्यांना शुभेच्छा पाठवू शकतात.
तुम्हीही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छिता? कसे ते येथे पाहा
- व्हिडीओ किंवा फोटो संदेश :
‘नमो अॅप’च्या मदतीने तुम्ही व्हिडीओ मेसेज रेकॉर्ड करू शकता किंवा तुमचा फोटो थेट अॅपमध्ये अपलोड करू शकता.
- ई-कार्ड :
यावर्षी पीएम मोदींच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी खास मॉड्यूल तयार करण्यात आले आहे. पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही वैयक्तिक ई-कार्ड पाठवू शकता. तसेच यात तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला समाविष्ट करून अॅपवर शुभेच्छा अपलोड करू शकता. इतकंच नाही, तर तुम्ही तुमचा ऑफिस परिवार, मित्रपरिवार यांच्या समवेत एकावेळी एकापेक्षा जास्त ई-कार्डसुद्धा पाठवू शकता.
- सेवेची भेट :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्याचा हा एक अभिनाव मार्ग आहे. याअंतर्गत तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रात शपथ घेऊ शकता. अॅपच्या युजर-फ्रेंडली इंटरफेसच्या मदतीने सर्व प्रतिज्ञा/शपथ रेकॉर्ड केल्या जातील.
- पंतप्रधानांच्या आयुष्यावर एक लहानसा व्हिडीओ :
याअंतर्गत तुम्ही नमो अॅपवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनातील क्षण निवडून त्यावर एक लहानसा व्हिडीओ बनवू शकता आणि तो अॅपवर अपलोड करू शकता.
- देणगी :
या अॅपच्या मदतीने तुम्ही स्वच्छ भारत मिशन, बेटी बचाओ बेटी पढाओ, किसान सेवा इत्यादी उपक्रमांसाठी पाच ते शंभर रुपयांच्या श्रेणीमध्ये सूक्ष्म देणगीही देऊ शकता.