उत्तर प्रदेश पोलीस राज्यातली गुन्हेगारी संपवण्यासाठी सध्या अॅक्शन मोडमध्ये आहे. पोलिसांना नुकतंच एक मोठं यश मिळालं आहे. यूपी पोलिसांनी मुजफ्परनगरमधील शाहपूर परिसरात कुख्यात गुंड राशिदला एन्काउंटमध्ये ठार केलं आहे. राशिदच्या डोक्यावर ५० हजार रुपयांचं बक्षीस होतं. गुन्हेगारी जगतात राशिदचं नाव ‘चलता-फिरता’ असं होतं. तसेच त्याला ‘सिपहिया’ या नावानेदेखील गुन्हेगारी जगात ओळखत होते. या एन्काउंटरदरम्यान एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
मुजफ्फरनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजीव कुमार म्हणाले, राशिदच्या डोक्यावर १४ ते १५ गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या तीन नातेवाईकांच्या खुनाच्या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता. राशिदने २०२० मध्ये पठाणकोटमध्ये माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याचे काका (आत्चाचे पती), काकी (चुलत्याची पत्नी) आणि चुलत भावाची हत्या केली होती.
संजीव कुमार यांनी सांगितलं की, आम्हाला माहिती मिळाली होती की, काही गुंड शाहपूर परिसरात फिरत आहेत. गुन्हा करण्याच्या उद्देशाने ते इथे आले होते. आम्हाला आमच्या खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून शाहपूर पोलीस आणि एसएसओने परिसरात शोधमोहीम सुरू केली.
हे ही वाचा >> “गीदड की खाल…”, साईबाबांवरील प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, “त्यांना ईश्वराचं स्थान…”
शोधमोहीम सुरू असताना पोलिसांनी मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोघांना अडवलं. हे दोघेही आंतरराज्यीय टोळीचे सदस्य होते. या दोघांपैकी एक राशीद होता. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. परंतु राशिदकडून गोळीबार सुरू झाला, त्यानंतर पोलिसांनीही बचावात गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात राशीद ठार झाला, तर त्याचा साथीदार दुचाकी सोडून शेतात पळून गेला. राशीदच्या कपड्यांमधून पोलिसांनी दोन शस्त्रे जप्त केली आहेत.