भारताला अनेक गुन्ह्य़ांत हवा असलेला कुख्यात गुंड छोटा राजन ऊर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ मोहन कुमार याला २० वर्षांनंतर इंडोनेशियातील बाली बेटांवर अटक करण्यात आली. इंटरपोलच्या ‘रेड कॉर्नर नोटिशी’च्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आठवडाभरातच छोटा राजनला भारताच्या ताब्यात दिले जाणार आहे. राजनला पकडणे हे भारतासाठी मोठे यश असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. राजन हा जवळपास २० गुन्ह्य़ांमधील आरोपी असून त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्रास्त्र साठा आदी गुन्ह्य़ांचा समावेश आहे.

दाऊद इब्राहिम टोळीचा कट्टर वैरी म्हणून ओळखला जाणारा छोटा राजन सिडनी येथून इंडोनेशियातील प्रसिद्ध पर्यटन बेट बाली येथे आला असता, त्याला रविवारी बाली पोलिसांनी अटक केली. छोटा राजनला पकडण्यासाठी भारताचा ऑस्ट्रेलियाकडे पाठपुरावा सुरू होता, असे सीबीआयच्या प्रवक्त्या देवप्रीत सिंह यांनी सांगितले. राज्य सरकार राजनला ताब्यात देण्याची मागणी केंद्राकडे करणार आहे. राजन हा खोटय़ा नावाने ऑस्ट्रेलियात राहात होता. त्याच्या बालीतील वास्तव्याबाबत ऑस्ट्रेलियाकडूनच माहिती मिळाली होती.

मूळ नाव – राजेंद्र सदाशिव निकाळजे

मुंबईत मराठी कुटुंबात जन्म. मुंबईच्या चेंबूरमधील टिळकनगर या मध्यमवर्गीय वसाहतीत मोठा झाला.
१९८० च्या दशकात सहकार सिनेमागृहाबाहेर तिकिटांचा काळा बाजार, तसेच भुरटय़ा चोऱ्यातून गुन्हेगारी जगतात प्रवेश.
बडा राजन आणि हैदराबादचा यादगिरी यांच्या छत्रछायेखाली गुन्ह्य़ाच्या जगतातील छक्केपंजे शिकून घेतले.
बडा राजनच्या हत्येनंतर छोटा राजन ही बिरुदावली आणि सत्ता मिळवली. काही काळ दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी या गुंडांबरोबर काम केले.
मुंबईतील १९९३ च्या साखळी बाँबस्फोटांनंतर दाऊदपासून फारकत घेतली. १९८८ साली दुबईला पलायन.
२६ ऑक्टोबर २०१५ – इंडोनेशियातील बालीत अटक.

काळी कारकीर्द..
मुंबईत जन्मलेल्या राजन याने भुरटय़ा चोऱ्या करीत गुन्हेगारी जगात सुरुवात केली. नंतर तो विषारी दारू विक्रीच्या धंद्यात बडा राजन म्हणजे राजन नायर याला मदत करीत होता. राजन नायरच्या खुनानंतर तो नायर टोळीचा प्रमुख बनला. १९८८ मध्ये छोटा राजन दुबईला पळाला, तो त्याआधी दाऊद इब्राहिम याच्याबरोबर काम करीत होता.