नवी दिल्ली : वक्फ (सुधारणा) विधेयक २०२५ मुस्लिमांवर हल्ला करणारे असून यानंतर भविष्यात अन्य धर्मीयांनाही लक्ष्य केले जाईल असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले लक्ष कॅथलिक चर्चच्या जमिनीकडे वळवले असल्याचा दावा करणारा एक लेख त्यांनी ‘एक्स’वर सामायिक केला.
दरम्यान, ‘असोसिएशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स’ (एपीसीआर) या स्वयंसेवी संस्थेने वक्फ विधेयकाच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील मुझफ्फनगर येथे वक्फ विधेयकाविरोधात निदर्शने करणाऱ्या २४ जणांना प्रशासनाने नोटीस बजावली आणि प्रत्येकाला २ लाख रुपयांचा जातमुचलका जमा करण्यास सांगितले.