पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी १९९९ मध्ये आपल्या विरोधात केलेल्या बंडासह दोनदा घटनेची जी पायमल्ली केली, त्या प्रकरणी त्यांच्यावर अतिशय तीव्र स्वरूपाच्या राजद्रोह आरोपाखाली खटला चालवला जाईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आज सांगितले. जर मुशर्रफ या आरोपाखाली दोषी ठरले तर त्यांना मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकेल.
शरीफ यांनी पाकिस्तानी पार्लमेंटचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीत सोमवारी ही घोषणा केली. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाचे सरकार आल्यानंतर अवघ्या तीन आठवडय़ांत त्यांनी हे महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. शरीफ यांनी सांगितले की मुशर्रफ यांनी केलेली कृत्ये ही तीव्र राजद्रोहाच्या कक्षेत येतात.
मुशर्रफ हे सध्या नजरकैदेत असून, त्यांना सर्वोच्च न्यायालयापुढे खटल्यास सामोरे जावे लागेल तसेच त्यांच्या प्रत्येक कृतीबाबत उत्तरे द्यावी लागतील.
२००७ मध्ये मुशर्रफ यांनी आणीबाणी लादली होती. त्याच्या संदर्भात शरीफ यांनी सांगितले, की ३ नोव्हेंबर २००७ रोजी मुशर्रफ यांनी घटनाच काही काळाकरिता निलंबित केली होती. तो निर्णय हा पाकिस्तानी राज्यघटनेच्या कलम ६ अन्वये अति तीव्र स्वरूपाचा राजद्रोहच होता. पंतप्रधानपदाच्या शपथेत राज्यघटनेचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे त्यामुळे आपण कलम ६ चे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला न्यायासनासमोर उभे करू.
मुशर्रफ यांच्यावर खटला चालवताना राजकीय शक्तींना विश्वासात घेतले जाईल, असे शरीफ यांनी म्हटले आहे. अ‍ॅटर्नी जनरल मुनीर मलिक यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाला मुशर्रफ यांच्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यास सांगण्यात आल्याचे स्पष्ट केले.