रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही महिन्यांपासून वर्तविण्यात आलेली रशिया-युक्रेन युद्धाची भीती अखेर खरी ठरली़  रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केल़े  त्यात ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाल़े  या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली़  या घडामोडींमुळे युद्धाचा झाकोळ जगभर पसरला़

आठ वर्षांपूर्वी क्रिमियाचा घास घेतलेल्या रशियाने काही महिन्यांपासून युक्रेनच्या सीमेवर सैन्याचा मोठा फौजफाटा तैनात केला.  गेल्या काही दिवसांत सीमेवरील हालचाली वाढल्याने युक्रेनला आपल्या प्रभावक्षेत्रात कायम ठेवण्यासाठी रशिया आक्रमणाचा मार्ग निवडेल, ही भीती खरी ठरवत अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी गुरुवारी युक्रेनमध्ये ‘लष्करी कारवाई’ची घोषणा केली़ गेले अनेक आठवडे युक्रेनवर आक्रमणाचा विचार नसल्याचा पुनरूच्चार करणाऱ्या पुतिन यांनी अचानक दूरचित्रवाणीवरून केलेल्या भाषणात पूर्व युक्रेनमधील नागरिकांच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचा दावा करत कारवाईचे जोरदार समर्थन केल़े  युक्रेनचे ‘निर्लष्करीकरण’ करण्यात येईल, असा दावा पुतिन यांनी यावेळी केला़

पुतिन यांच्या घोषणेनंतर काही क्षणांतच रशियाने युक्रेनवर हल्लासत्र सुरू केल़े  सुरूवातीला हवाई हल्ले करून युक्रेनचे लष्करी तळ लक्ष्य करण्यात आल़े  त्यानंतर जल आणि भूमार्गे हल्ले सुरू झाल़े  रशियन सैन्याची वाहने क्रिमियामार्गे युक्रेन सरकारनियंत्रित भागांत घुसविण्यात आली़  युक्रेनमधील हवाई तळांसह ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा रशियाने केला़

युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाशी सर्व राजनैतिक संबंध तोडून देशात लष्करी कायदा लागू केला़  देशातील नागरिकांना स्वरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची मुभा देत झेलेन्स्की यांनी रशियाविरोधात नेटाने लढण्याचा निर्धार व्यक्त केला़ मात्र, रशियाच्या शक्तिशाली सैन्यापुढे युक्रेनची संरक्षण यंत्रणा तोकडी पडली़  रणगाडे आणि शस्त्रसज्ज रशियन सैन्याच्या हल्ल्यानंतर राजधानी किवबरोबरच अन्य शहरांत जीव वाचविण्यासाठी नागरिकांची एकच धावाधाव सुरू झाली़  सुरक्षित आसरा शोधण्यासाठी रेल्वे स्थानके आणि रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती़

रशियाच्या या हल्ल्याचा अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी निषेध करत नवे निर्बंध लागू करण्याची घोषणा केली़  ‘नाटो’ने सर्व सदस्यदेशांच्या संरक्षणाची ग्वाही देत कोणतीही आगळीक खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा रशियाला दिला असून, या युद्धाची भयछाया जगभर पसरली आह़े

भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी तेथील भारतीय दूतावासाने गुरुवारी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या़  लष्करी कायदा लागू झाल्याने तिथे वाहतुकीत अडथळे येत असल्याने घरीच थांबण्याचे आवाहन दूतावासाने भारतीयांना केल़े  आपल्याला मायदेशी परत पाठविण्यासाठी दूतावासाकडून प्रयत्न करण्यात येत असून, तोपर्यंत घरातच थांबा, तसेच जवळच्या बॉम्बरोधक शिबिरांमध्ये आसरा घ्या, अशी सूचना राजदूतांनी केली़

रशियाचा युक्रेनवरील हल्ला हे क्रौर्य आह़े  या युद्धामुळे उपखंडातील शांतता भंगली आह़े  मात्र, ‘नाटो’ ही शक्तिशाली संघटना आह़े  सदस्यदेशांच्या प्रत्येक इंच भूभागाचे संरक्षण करण्यास ‘नाटो’ समर्थ आह़े

-जेन्स स्टोल्टनबर्ग, सरचिटणीस, ‘नाटो’

भारताचा सावध पवित्रा

रशियाने युक्रेनमध्ये ‘लष्करी कारवाई’ची घोषणा केल्यानंतर पाश्चात्य देशांमध्ये निषेधाचा सूर उमटला़  भारताने मात्र सावध भूमिका घेतली़  या घडामोडींबद्दल खेद व्यक्त करणारे निवेदन सरकारने गुरुवारी सकाळी प्रसृत केल़े  त्यानंतर परराष्ट्रमंत्री एस़ जयशंकर यांनी युरोपीय महासंघातील पदाधिकारी, ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री यांच्यासह अनेकांशी चर्चा करून तोडगा काढण्याबाबत चर्चा केली़  मात्र, भारत हा रशियाच्या हल्ल्याचा स्पष्ट शब्दांत निषेध करत नसल्याचे चित्र पाश्चात्य देशांमध्ये निर्माण झाल़े  

मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक

रशियाच्या युक्रेनमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषय समितीची बैठक झाली़  या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस़ जयशंकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होत़े  युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली़  तेथील भारतीयांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आल़े

मोदी-पुतिन चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री दूरध्वनीद्वारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली़  रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात, या भूमिकेचा पुनरूच्चार करून मोदी यांनी हिंसाचार थांबविण्याचे आवाहन पुतिन यांना केल़े  युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही मोदी यांनी यावेळी नमूद केल़े

‘नाटो’वर खापर

’पूर्व युक्रेनमधील नागरिकांच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचा दावा करत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी या हल्ल्याचे जोरदार समर्थन केल़े 

’या कारवाईत अन्य देशांनी हस्तक्षेप केल्यास अभूतपूर्व विपरित परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकीही पुतिन यांनी दिली़ 

’युक्रेनला ‘नाटो’मध्ये सहभागी करून न घेण्याची आणि सुरक्षेची हमी न दिल्याने ही कारवाई करत असल्याचे सूचित करून पुतिन यांनी युद्धाचे खापर अमेरिका आणि त्याच्या मित्रदेशांवर फोडल़े

रशियाचे कृत्य हे ‘नाझी जर्मनी’ने दुसऱ्या महायुद्धादरम्यान केलेल्या हल्ल्यांप्रमाणे आह़े  पण, युक्रेनचे नागरिक या हल्ल्याचा प्रतिकार करतील़  अखेपर्यंत लढू आणि युक्रेनचे स्वातंत्र्य अबाधित राखू़ 

 -व्होलोदिमिर झेलेन्स्की, युक्रेनचे अध्यक्ष

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: War broke out russia attack destroys 74 ukrainian military bases 50 killed including 40 soldiers akp