रविवारी अर्थात २३ एप्रिल रोजी सकाळी ७ च्या सुमारास अमृतपाल सिंगला पंजाबच्या रोड गावातून अटक करण्यात आली. गेल्या एक महिन्याहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरलेल्या अमृतपालच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलं. आधी अमृतपाल सिंगनं शरणागती पत्करल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, नंतर त्याच्याकडे पळून जाण्याचा पर्याय शिल्लक राहिला नसल्यामुळे तो अटक झाल्याचा खुलासा पोलिसांकडून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांच्या या ‘ऑपरेशन अमृतपाल’ची जोरदार चर्चा देशभर चालू आहे!

अशी झाली अमृतपाल सिंग याला अटक!

वारिस पंजाब दे या खलिस्तान समर्थक संघटनेचा म्होरक्या असणारा अमृतपाल १८ मार्चपासून पोलिसांना गुंगारा देत होता. पंजाब पोलिसांकडून अमृतपालचा ठिकठिकाणी शोध घेतला जात होता. १८ मार्चला तर तो पोलिसांच्या ताब्यात येण्यापासून थोडक्यात वाचला. एका बाईकवर बसून तो फरार झाल्याचे व्हिडीओही नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, अखेर रविवारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. २३ एप्रिलला सकाळी त्याला अटक झाली असली, तरी २२ तारखेच्या मध्यरात्रीपासूनच पंजाब पोलिसांसह खुद्द मुख्यमंत्री भगवंत मान हेही रात्रभर घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून होते. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांना गुप्तचर विभागाचा मध्यरात्री फोन!

२२ तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याचा फोन आला. भिंद्रनवालेंचं मूळ गाव असणाऱ्या रोडमध्ये अमृतपाल सिंग एका गुरुद्वारामध्ये अमृतपाल लपल्याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. यानंतर भगवंत मान यांनी लागलीच पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांना फोन करून कारवाईचे आदेश दिले. मात्र, हे करताना गुरुद्वाराचं पावित्र्य राखलं जाईल, याची खातरजमा करण्यासही त्यांनी सांगितलं.

जर्नेलसिंग भिंद्रनवालेशी तुलना ते दुबईतील वास्तव, आत्मसमर्पण केलेला अमृतपाल सिंग कोण आहे? पोलीस त्याचा शोध का घेत होते?

मुख्यमंत्र्यांच्या मदतनीसाने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रमुखांना सांगितलं होतं की अशी कोणतीही घटना तिथे घडू नये ज्याचे परिणाम राज्याला दीर्घकाळ भोगावे लागतील. त्यांनी एकही गोळी न झाडण्याचे आदेश दिले. तसेच, पोलीस गुरुद्वारामध्ये प्रवेश करणार नाहीत, अशीही सक्त ताकीद मुख्यमंत्र्यांनी दिली.”

गावात मोठा पोलीस फौजफाटा, पण गडबड नाही!

अमृतपाल सिंग रोड गावात असल्याचं समजल्यानंतर तातडीने सूत्र हलली. संपूर्ण गावाची नाकेबंदी करण्यात आली. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी डीजीपींना आदेश दिले की पोलीस फौजफाटा गावात गेल्यामुळे कोणतीही गडबड-गोंधळ होऊ नये. त्यासाठी सर्व पोलीस साध्या वेशात गावात पाठवण्यास सांगितलं. तसेच, अमृतपाल सिंगला अटक केल्यानंतर त्याचे राज्यभर काही वेगळे पडसाद उमटू शकतात का, याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. मात्र, त्याच्या सर्व प्रमुख सहकाऱ्यांना अटक झाल्यामुळे तो एकटा पडला आहे अशी माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात आली.

…आणि अमृतपाल सिंगला संदेश गेला!

पोलिसांनी संपूर्ण गावाची नाकेबंदी केल्यानंतर आणि गावभर पोलीस साध्या वेशात सज्ज झाल्यानंतरच रोडमधील त्या गुरुद्वारामध्ये अमृतपालला संदेश पाठवण्यात आला. कोणत्याही प्रकारे पळून जाण्याचा प्रयत्न अपयशी ठरेल, याची माहिती अमृतपालपर्यंत पोहोचवण्यात आली. जेव्हा अमृतपाल सिंगला हे पटलं की आता हातपाय हलवून काहीही साध्य होणार नाही तेव्हा सकाळी ७ च्या सुमारास तो गुरुद्वाराबाहेर आला आणि त्याला पोलिसांनी अटक केली, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने या वृत्तात देण्यात आली आहे.

भिंद्रनवालेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न, वडिलांचा व्यवसाय सोडून भारतात आला; जाणून घ्या अमृतपालसिंगचा पंजाबमधील उदय आणि अस्त!

अमृतपालचा व्हिडिओ आणि संभ्रम!

दरम्यान, अमृतपाल सिंग यानं गुरुद्वारातून बाहेर येण्याआधी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात तो शरणागती पत्करत असल्याचा दावा त्यानं केला होता. मात्र, नंतर पोलिसांनी यावर स्पष्टीकरण जारी केलं. अमृतपाल सिंगनं शरणागती पत्करली नसून त्याच्याकडे इतर कोणताच पर्याय राहिला नसल्यामुळे तो अटक झाला असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Story img Loader