पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तापमानाची सुधारित माहिती विचारात घेता जागतिक तापमानवाढ थांबल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. ‘नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एनओएए) या संस्थेतील वैज्ञानिकांचा अहवाल ‘सायन्स’ नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. एकविसाव्या शतकात तापमानवाढ स्थिर झाली असा एक अंदाज होता, पण तो या अहवालामुळे खोटा ठरला आहे. उलट तापमानवाढ होतच आहे.
अहवालात म्हटले आहे, की नव्या विश्लेषणानुसार विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातही जागतिक तापमानवाढ कमी झालेली नव्हती व ती मनुष्यनिर्मित होती. त्याचबरोबर एकविसाव्या शतकातील पहिल्या पंधरा वर्षांंत तापमानवाढ थांबली असा जो दावा केला जात होता तो खरा नाही, उलट त्या काळात तापमानवाढ चालूच होती. वेधशाळांनी जमिनीवरून व जहाजातून घेतलेल्या तापमानाच्या नोंदींचा विचार यात करण्यात आला आहे. तापमान नोंदी लक्षात घेता विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तापमानवाढ जेवढी होती तेवढीच एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या पंधरा वर्षांंत होती. वाढत्या तापमानाचे उच्चांक झाले असून, ‘एनओएए’ या संस्थेने आधुनिक इतिहासातील २०१४ हे सर्वात उष्ण वर्ष असल्याचे म्हटले होते. १८८० मध्ये तापमान नोंदी सुरू झाल्या तेव्हापासून आताचा मार्च हा सर्वात उष्ण महिना होता. जानेवारी ते मार्च हा काळच सर्वात उष्ण होता.
वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, जीवाश्म इंधनांच्या ज्वलनातून हरितगृह वायू तयार होतात व त्यामुळे तापमान वाढते. ध्रुवीय बर्फ व हिमनद्या वितळतात, सागराची पातळी वाढते. या वर्षी पॅरिसमध्ये हवामानविषयक चर्चा होणार आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन या संस्थेचे हवामानशास्त्राचे प्राध्यापक मार्क मॅसलिन यांच्या मते कुटीरोद्योगांनी तापमान वाढ थांबली असल्याचा एक समज करून दिला होता तो चुकीचा आहे. गेल्या ६५ वर्षांपेक्षा अलीकडच्या पंधरा वर्षांत तापमान वाढ जास्त झाली आहे.
*पृथ्वीची तापमान वाढ थांबलेली नाही
*जानेवारी ते मार्च सर्वात उष्ण काळ
*जीवाश्म इंधनांचे ज्वलन हे तापमानवाढीचे कारण
*गेल्या पंधरा वर्षांत तापमानवाढ जास्त

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा