उत्तराखंडमध्ये गेल्या महिन्यात अचानक आलेल्या पुराच्या अतिपावसाच्या शक्यतेबाबत भारतीय हवामान विभागाने अगोदरच इशारा दिला होता, असे विभागाचे महासंचालक डॉ. एल. एस. राठोड यांनी येथे सांगितले.

उत्तराखंड येथील जास्त पावसाबाबत इशारा देण्यात भारतीय हवामान विभाग अपयशी ठरल्याचा हवामान विभागाचे महासंचालक राठोड यांनी इन्कार केला. याबाबत वेळीच पूर्वसूचना देण्यात आल्या होत्या. पर्वतीय प्रदेशात मोठय़ा प्रमाणात पाऊस होईल असे त्यात स्पष्ट म्हटले होते.
कटिबंधीय वादळांबाबत भाकित करण्याच्या हवामान विभागाच्या क्षमतेत बरीच प्रगती झाली असून विजा पडून व इतर कारणांनी होणारे मृत्यू कमी झाले आहेत. दुर्घटनेतील मृत्यूंची संख्या कमी झाली आहे, असे त्यांनी वार्ताहरांना सांगितले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हवामान अंदाजातील अचूकता वाढत आहे, यापुढे तालुका पातळीवरही हवामानाची आगाऊ माहिती पुरवली जाईल त्यामुळे पेरणी व इतर कृषी कामांमध्ये त्याची मदत होईल. वाईट हवामानाचा पिकांवर होणारा दुष्परिणाम कमी करणे हा त्यातील हेतू आहे असे सांगून ते म्हणाले की, बाराव्या पंचवार्षिक योजनेत पर्वतीय भागातील वादळांचा अंदाज अधिक चांगल्या प्रकारे वर्तवण्यासाठी आधुनिक यंत्रणा वापरण्याचा विचार आहे.