क्रिप्टो बूमने आतापर्यंतच्या महान गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या वॉरन बफे यांना त्यांच्या शब्दांवरून परत फिरण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे. कारण, बिटकॉइनला विष म्हणणाऱ्या वॉरन बफे यांनी संबंधित बँकेत तब्बल एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे.
बर्कशायर हॅथवेने २०१८ च्या वार्षिक शेअरहोल्डर मीटिंगमध्ये (CNBC नुसार) बिटकॉइनला विष “rat poison squared” म्हणून संबोधल्यानंतर आणि त्याविरूद्ध गुंतवणूकदारांना सूचक इशारा दिल्यानंतर, बफे यांनी आता स्पष्टपणे यू-टर्न घेतला आहे आणि क्रिप्टो-अनुकूल बँकेमध्ये एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला, बफे यांची कंपनी बर्कशायर हॅथवेने आपली क्रिप्टो गुंतवणूक SEC फाइलिंगसह सार्वजनिक केली. फाइलिंगमध्ये असे दिसून आले आहे की वॉरेन बफे यांच्या कंपनीने नुबँक नावाच्या ब्राझील आधारित डिजिटल बँकेचे १ अब्ज डॉलर्सचे शेअर्स खरेदी केले आहेत, जी लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठी आहे.
नुबँक, जी एक तथाकथित निओबँक आहे, ही एक प्रकारची बँक आहे जी पारंपारिक बँकिंग प्रणालीच्या नियमांच्या बाहेर चालते. ‘क्रिप्टो फ्रेंडली’ डिजिटल बँकेचे गुंतवणूक युनिट, NuInvest, त्याच्या वापरकर्त्यांना बिटकॉइन एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETF) मध्ये पैसे ठेवण्याची परवानगी देते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नुबँकमधील बफेंच्या कंपनीने केलेली ही नवीन गुंतवणूक या मार्केटमध्ये पहिल्यांदाच आलेली नाही. गेल्या वर्षी, बर्कशायरने डिसेंबर २०२१ मध्ये कंपनी सार्वजनिक होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच Nubank मध्ये ५०० दशलक्ष डॉलर्सचे भागभांडवल विकत घेतले होते. तर, त्यावेळी नुबँकने जाहीर केले होते की बर्कशायरने केलेली ही गुंतवणूक फिनटेक बँकेला मिळालेली सर्वात मोठी एकल गुंतवणूक आहे.
बर्कशायर २०२१ मध्ये क्रिप्टो क्षेत्रात आपली गुंतवणूक वाढवत असताना, कंपनीने तिच्या काही इतर, अधिक पारंपारिक आर्थिक मालमत्ता देखील सोडल्या. नुकत्याच झालेल्या SEC फाइलिंगमध्ये नुबँकमध्ये १ बिलियन डॉलरची गुंतवणूक दाखवली आहे. याचबरोबर बर्कशायरने हा देखील खुलासा केला की व्हिसा आणि मास्टरकार्डच्या आपल्या शेअर्समध्ये ३ बिलियन डॉलर्सपेक्षा अधिक घसरण झाली होती.