इराणला इशारा देण्याचा हेतू- अमेरिका
इराणला धमकावण्याच्या उद्देशाने अमेरिकेची यूएसएस अब्राहम लिंकन ही विमानवाहू युद्धनौका व बॉम्बफेकी दल मध्यपूर्वेत तैनात करण्यात आले आहे. अमेरिका व मित्र पक्षांवर हल्ला केला तर त्याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इराणला देण्याचाच यात हेतू आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे.
इराणने काही कृतींमधून संघर्षांचे संकेत दिले असल्याने यूएसएस अब्राहम लिंकन युद्धनौका मध्यपूर्वेत आणण्यात आली आहे. अलीकडेच अमेरिकेने भारत व चीनसह इतर देशांना इराणकडून तेल आयात बंद करण्याचा इशारा दिला होता, त्यानंतर इराणची तेल निर्यात कमी होऊन परिस्थिती खालावण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर इराणबरोबरचा अणुकरार रद्द केला होता. त्याशिवाय इराणमधील राजवटीवर र्निबध लागू केले होते.
इराणला धोक्याचा इशारा देण्यासाठीच युद्धनौका मध्यपूर्वेत आणली असून अमेरिका व मित्र देशांना धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशारा यातून इराणला देण्यात येत आहे, असे बोल्टन यांनी सांगितले.
अमेरिकेला इराणशी युद्ध करण्याची इच्छा नाही पण त्यांनी कुरापती काढून छुपे युद्ध सुरू केले तर त्याला कठोर प्रत्युत्तर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. इराणपासून धोका असल्याचे अमेरिकेला वाटत असून गेल्या महिन्यात इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डला परदेशी दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले होते. एखाद्या देशाच्या लष्कराला दहशतवादी संघटना जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यातून इराणचे लष्कर हे आता आयसिस, अल कायदा, हेज्बोल्ला व हमास यांच्या रांगेत जाऊन बसले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी यांनी ही विखारी चाल व चूक असल्याचे म्हटले होते.