सीबीआयकडून सुरू असलेल्या चौकशीमुळे सध्या अडचणीत सापडलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव नव्या वादात सापडले आहेत. तेजस्वी यांच्या सुरक्षारक्षकांनी बुधवारी सचिवालयाच्या परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की केली. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तेजस्वी यादव बाहेर आले तेव्हा हा प्रकार घडला. त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे अनेक प्रतिनिधी बाहेर ताटकळत उभे होते. त्यामुळे तेजस्वी यादव सचिवालयातून बाहेर पडतात प्रसारमाध्यमांनी त्यांच्याभोवती मोठी गर्दी केली. तेव्हा तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांनी एका कॅमेरामन आणि वृत्तवाहिनीच्या एका प्रतिनिधीला अक्षरश: धक्के मारून तेथून दूर केले. साहजिकच या प्रकारामुळे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी प्रचंड संतापले. त्यामुळे आता तेजस्वी यादव यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/885076284862324736

गेल्या काही दिवसांपासून लालू प्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबिय सीबीआयच्या रडारवर आहेत. सीबीआयने शुक्रवारी रेल्वे उपहारगृहातील घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव, आयआरसीटीचे माजी व्यवस्थापकीय संचालक पी.के. गोयल , लालूंचे निकटवर्तीय असलेल्या प्रेमचंद गुप्ता यांची पत्नी सुजाता यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर सीबीआयने राबडी देवी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची चौकशी केली होती.

तेजस्वीच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही- लालूप्रसाद यादव

मात्र, तेजस्वी यादव यांनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. २००४ मध्ये मी १३-१४ वर्षांचा होतो, मला मिसरुडही फुटलं नव्हतं, मग मी भ्रष्टाचार कसा करेन असा सवाल तेजस्वी यादव यांनी विचारला आहे. मी मंत्री झाल्यापासून भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. माझ्या अंतर्गत येणाऱ्या तीन खात्यांमध्ये भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण समोर आलेले नाही असा दावा तेजस्वी यादव यांनी केला. लालूप्रसाद यादव यांच्यासोबतच त्यांचा २८ वर्षांचा मुलगाही वरचढ चढत असल्याने आमच्यावर कारवाई होत असल्याचा दावा त्यांनी केला. माझ्याविरोधात दाखल झालेला गुन्हा हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदींनीच हे षडयंत्र रचले असून त्यांना आता माझी भीती वाटू लागली आहे. सुरुवातीपासूनच भाजपला महाआघाडी फोडायची होती. याशिवाय प्रत्येक गुन्ह्यात बिहारचे नाव घेऊन त्यांना बिहारची प्रतिमा मलिन करायची होती असा आरोप त्यांनी केला. आम्ही भाजपला सडेतोड उत्तर देऊ, त्यांना आमच्या राज्यात थारा देणार नाही असा निर्धारच तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला.

…तर नितीश कुमारांना बाहेरुन पाठिंबा देऊ- भाजप