उत्तर प्रदेशमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर आता याठिकाणी मुख्यमंत्री कोण होणार, याची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे. उत्तर प्रदेश सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या प्रचंड संवेदनशील असल्याने याठिकाणी भाजपला खंबीर आणि तोलामोलाचे नेतृत्त्व द्यावे लागणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह मुख्यमंत्रीपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असल्याची चर्चा आहे. मात्र, आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या सर्व चर्चा फालतू असल्याचे सांगितले.
राजनाथ सिंह बुधवारी साऊथ ब्लॉकमधील गृह मंत्रालयाच्या कार्यालयाजवळ आले तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तुम्ही उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आहात, अशी चर्चा आहे, याबद्दल काय सांगाल, असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारला. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी ही शक्यता फेटाळून लावत ही चर्चा फालतू आणि विनाकारण सुरू असल्याचे सांगितले.
#WATCH: HM Rajnath Singh says talks about his name being in the running for Uttar Pradesh CM are, "unnecessary & futile" pic.twitter.com/o24cxRxwTS
— ANI (@ANI) March 15, 2017
Rajnath Singh says, "all these talks are futile & unnecessary" on question of his name being in the running for Uttar Pradesh CM pic.twitter.com/BB5oREKrIa
— ANI (@ANI) March 15, 2017
राजनाथ सिंह हे लखनऊ मतदारसंघातील खासदार असून उत्तर प्रदेशात भाजपला विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी राजनाथ सिंह, भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य, खासदार आदित्यनाथ योगी आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांची नावे चर्चेत आली होती. मात्र, राजनाथ सिंह यांनी आज आपण या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता इतर नेत्यांपैकी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. दरम्यान, गेल्या काही दिवसांत या स्पर्धेत आणखी एक चेहरा अनपेक्षितपणे पुढे आला आहे. कानपूरमधील महाराजपूर मतदारसंघातून निवडून आलेल्या सतीश महाना मुख्यमंत्रीपदासाठी अचानक चर्चेत आले आहेत. ते भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मर्जीतील नेत्यांपैकी एक आहेत.
उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्रिपदाचा नवीन चेहरा हा आश्चर्यचकित करणारा असू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यात भाजप दोन उपमुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावरही विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. महाना हे आरएसएसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत कार्यरत होते आणि तीच बाब त्यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय समितीच्या बैठकीतही तसे संकेत दिले होते. काही लोक ‘ब्रेकिंग’मध्ये कधीच नसतात, पण त्यांचे काम चांगले असते, असे मोदी म्हणाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार महाना यांना रविवारी तातडीने दिल्लीलाही बोलावण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. कानपूरमधून ते सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. महाना यांनी बसपच्या मनोज कुमार शुक्ला यांचा ९१८२६ मतांनी पराभूत केले होते. कानपूरमध्ये त्यांची वेगळी अशी ओळख आहे. निवडणुकांच्या आधीपासूनच भाजपचे सरकार आले तर महाना यांना मंत्रिपद निश्चित आहे, अशी चर्चा होती. पण आता त्यांचे नाव थेट मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे.