Prime Minister Narendra Modi Meet US Vice President JD Vance : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी, २१ एप्रिल रोजी रात्री अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स, त्यांच्या पत्नी उषा व्हॅन्स आणि त्यांची तीन मुलांचं पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी स्वागत केलं. तसंच इवान, विवेक आणि मिराबेल या जेडी व्हॅन्स यांच्या मुलांबरोबर काही हलकेफुलके क्षणही साजरे केले. यासंदर्भातील व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मोदींनी दोन्ही मुलांचे हस्तांदोलन आणि हाय-फाइव्ह करून स्वागत केले, तर लहान मीराबेलला तिच्या आईने कडेवर घेतलं होतं. मुलांना हाताला धरून पंतप्रधानांनी निवासस्थानात फेरफेकटा मारला.

सर्वजण घरात गेले, तेव्हा मोदींनी मीराबेलच्या गालावर प्रेमाने हात फिरवला आणि नंतर जेडी व्हान्ससोबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी मुलांना सोफ्यावरच बसवलं होतं. त्यामुळे वातावरणात खेळकरपणा होता. तसंच, मोदींनी मुलांना मांडीवर घेऊनही खेळवलं. त्यांच्याशी संवाद साधला. मोदींनी मुलांना मोरपंख देऊन त्याने कसं लिहायचं ते दाखवलं. पंखाने खेळल्यानंतर मीराबेलने तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावर एक खेळकर स्पर्श केला, यामुळे सर्वत्र हास्य पसरले. कौटुंबिक संवादानंतर, पंतप्रधान मोदी आणि व्हॅन्स यांनी औपचारिक द्विपक्षीय चर्चा केली.

द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील

एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की नरेंद्र मोदी व अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला. तसेच दोघांनी भारत व अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार करारातील प्रगतीचं स्वागत केलं. त्याचबरोबर परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक व जागतिक मुद्यांवर सविस्तर चर्चा केली.

व्हॅन्स व मोदी यांच्यात काय चर्चा झाली?

दोन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर सरकारतर्फे जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पंतप्रधान मोदी व व्हॅन्स यांनी ऊर्जा, संरक्षण व धोरणात्मक तंत्रज्ञानात सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही बाजूने चालू असलेल्या प्रयत्नांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी अमेरिका व भारतामधील द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला आणि त्याचं सकारात्मक मूल्यांकन केलं.