काही पत्रकार महिलांनी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केल्याने भाजपाच्या अडचणी वाढत असून या प्रकरणावर पक्षाचे नेते मौन बाळगणेच पसंत करत आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी या मुद्द्यावर भाष्य करणे टाळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विशेष म्हणजे सुरुवातीला नारीशक्तीबाबत भाष्य करणारे संबित पात्रा अकबर यांच्यासंदर्भात प्रश्न विचारताच तिथून जाताना या व्हिडिओत दिसत आहे.
हरयाणातील फरिदाबाद येथे दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या महिला मोर्चातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संबित पात्रा यांनी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर संबित पात्रा यांना पत्रकारांनी गाठले. पत्रकारांना पाहताच संबित पात्रा प्रतिक्रिया देण्यासाठी थांबले. नारीशक्तीबाबत प्रतिक्रिया देखील दिली. ‘नारीशक्तीला प्राधान्य दिल्याने सर्व महिलांनी कार्यक्रमात मोदींचे आणि विजया रहाटकर यांचे आभार मानले’, असे त्यांनी सांगितले. यानंतर पत्रकारांनी त्यांना एम. जे. अकबर यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताच संबित पात्रा तिथून निघून गेले. पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु ठेवल्यानंतरही संबित पात्रा यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले.
Beti Bachao, as Sambit Patra runs away with tails between his legs when asked about allegations on MJ Akbar, just when he was lecturing on women's empowerment !!
Abki Baar __________ Ki Sarkar !! pic.twitter.com/C1gZZY1tAN— Rishi sharma (@Rishi_46) October 16, 2018
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून भाजपाच्या दुटप्पीभूमिकेवर अनेकांनी टीका केली. एकीकडे नारीशक्तीबाबत भाष्य करायचे आणि दुसरीकडे लैंगिक छळाचा आरोप असलेल्या व्यक्तीला पदावर कायम ठेवायचे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.
दरम्यान, अनेक महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर लैंगिक शोषण आणि गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. अकबर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. तसेच प्रिया रामाणी यांच्याविरोधात मानहानीचा खटला देखील दाखल केला होता. रमाणी यांनीच सर्वप्रथम अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केला आहे. एम. जे. अकबर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली असली तरी अद्याप सरकारने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.