देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्यानंतर बहुजन समाज पक्षातील नेत्याच्या मुलाने हातात पिस्तूल घेऊन हॉटेलमध्ये अक्षरश: धुडगूस घातला. नेत्याचा मुलगा हातात पिस्तुल घेऊन एका तरुणीला आणि तिच्या मित्राला धमकावतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

बहुजन समाज पक्षाचे नेते आणि माजी खासदार राकेश पांडे यांचा मुलगा आशिष पांडे हा रविवारी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला होता. तिथे त्याचा दोघांशी वाद झाला. या वादानंतर आशिषने त्याच्याकडील पिस्तुल बाहेर काढली.आशिषने तरुणीला व तिच्या मित्राला धमकावले. हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ हातात पिस्तुल घेऊन धमकी देणाऱ्या आशिषचा व्हिडिओ दिल्लीत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनीही या व्हिडिओची दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. आशिषला ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांची टीम लखनौला रवाना झाल्याचे वृत्त आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार आशिष हा हॉटेलमधील महिलांच्या स्वच्छतागृहात घुसायच्या प्रयत्नात होता. यावरुनच हा वाद झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या वृत्ताबाबत दुजोरा दिलेला नाही.

Story img Loader